दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर; एकत्रिकरणाची चर्चा, पण...
सातारा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे एका मुलाखतीत राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची अप्रत्यक्ष चर्चा घडवली. राष्ट्रवादीच्या एकीकरणासंदर्भात पुढची पिढी निर्णय घेईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी गुगली टाकत शरद पवारांनी दिवसभर साताऱ्यात प्रसार माध्यमांना खिळवून ठेवले. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व आमदार शशिकांत शिंदे हे कर्मवीर पुण्यतिथी निमित्त एकाच व्यासपीठावर आल्याने राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते एकत्रिकरणाच्या चर्चेने सुखावले मात्र पवारांच्या गुगली वर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सावधपणे या विषयावर इन्कार केला.
पवारांनी प्रसारमाध्यमांना हात जोडत मी यापूर्वीच बरेच काही बोललो असल्याचा इशारा केला तर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पवार यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे विधान शरद पवार यांनी कोणत्या संदर्भाने वापरले याबाबत मला कल्पना नाही असे सांगितले. मात्र रयतच्या कार्यक्रमात खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मकरंद आबा पाटील यांच्यातील हास्यविनोद बरेच काही सांगून जात होते. जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा याबाबत वरिष्ठांनी काय चर्चा केली हे मला माहीत नसल्याचे स्पष्ट केले.
साताऱ्यात आल्यापासून शरद पवारांनी केलेल्या गुगलीने संपूर्ण कार्यक्रमावर राष्ट्रवादीच्या एकत्रित करण्याचे गारुड राहिले होते तसेच भारत-पाक या दोन देशातील युद्धजन्य परिस्थितीवर शरद पवार काय भाष्य करणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून होते. एकाच महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोनदा एकाच व्यासपीठावर आले. रयत कार्यकारणीच्या सदस्यांची बैठक हे दोन्हीवेळी एकत्र येण्याचे कारण होते. अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी न बोलणे पसंत केले ते तातडीने जरंडेश्वर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमांसाठी निघून गेले.
शरद पवार यांच्या स्वागतासाठी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर हे पुष्पगुच्छ घेऊन आवर्जून उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती. खासदार निलेश लंके यांचे सुद्धा हेलिकॉप्टरमधून शरद पवार यांच्या सोबत आगमन झाल्याने शरद पवार साताऱ्यात काही मोठी राजकीय घोषणा करणार अशा शक्यता निर्माण झाल्या होत्या. मात्र निलेश लंके यांनी सुद्धा याबाबत वरिष्ठांच्या समन्वय समितीची बैठक अद्याप झाली नाही. या निर्णयाबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे स्पष्ट केले.
महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढ्ण्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथे सुतोवाच केले आहे. रात्री उशिरा सर्किट हाऊस येथे मुक्कामात शरद पवार यांची माजी आमदार बाळासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी भेट घेतली व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. रात्री उशिरा पवारांनी सर्वांची मते ऐकून घेत कोणालाही नाराज केले नाही. पवार राजकीय जीवनातून निवृत्तीचे संकेत देत पुण्यातून साताऱ्यात दाखल झाले होते मात्र आपल्या चेहऱ्यावर कोणती खळखळ न दाखवता शरद पवारांनी भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य केले. रयतच्या गुणवंतांचे कौतुक केले व तिथून ते पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणची चर्चा साताराच्या राजकारणात दिवसभर हेलकावत राहिली. राष्ट्रवादी एकत्र येणार असे वाटत असताना वरिष्ठांनी इन्कार केल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडले.