
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र; चंदगडनंतर आता 'या' ठिकाणी लढवणार एकत्रित निवडणूक
बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सुनील शेळके, सुनील टिंगरे, शंकर मांडेकर, जालिंदर कामठे आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भरणे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कार्यकर्त्यांचे मत काय आहे हे नेते आणि प्रमुख पदाधिकारी जाणून घेत आहेत. निवडणुकांमध्ये जागा कशा वाढतील यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. इच्छुक उमेदवार अजून अजित पवारांची भेट घेत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतल्यावरच युती, आघाडी बाबत निर्णय होणार आहे.
युतीबाबत निर्णय घेणार
भाजप, सेना, राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करावी तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित आणण्याबाबत देखील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. तशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे, त्यामुळे त्या त्या स्थानिक ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे ऐकूणच निर्णय घेतला जाणार आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती भरणेंनी दिली.
आंबेगाव तालुक्यात महायुती फिस्कटली?
आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात महायुती फिस्कटल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे तर भाजपा स्वतंत्रपणे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. दरम्यान तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे होणारी निवडणूक पक्षाच्या दृष्टीने कठीण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकर्ते अद्यापही सुस्त असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला दिसून येत नाही. त्यामुळे साहजिकच होणारी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने जड जाणार हे मात्र तितकेच खरे.