माळशिरसमधील भाजपाचे नेतृत्व राम सातपुतेंकडेच? 'या' बड्या नेत्याने दिले संकेत
माळशिरस : अकलूज येथील माने पाटील परिवार हा मूळचा म्हसवड येथील असून माण तालुक्याशी त्यांची नाळ घट्ट आहे. आपल्या उद्योग व्यवसायाशी प्रामाणिक असणारे सुजयसिंह माने पाटील माळशिरस तालुक्यात भाजपासाठी देखील तितकेच प्रामाणिकपणे काम करीत आहेत. माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात निवडणुका लढविल्या जातील, असे संकेत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
अकलूज येथे अकलूजचे भाजपा मंडळ अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील यांच्या निवासस्थानी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, शशिकांत उर्फ बाळासाहेब माने पाटील, हिंदुराव माने पाटील, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, हसराज माने पाटील, विक्रम माने, जयराज माने पाटील, सुरेश गायकवाड, श्रीपती वाघ, सजीराव कदम, आण्णा इनामदार, संजय देशमुख, महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, माने पाटील, माने देशमुख परिवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गाेरे म्हणाले, आगामी काळ हा निवडणुकांचा काळ असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या भाजपाला अग्रभागी ठेवण्याचे आवाहन केले. हिंदुराव माने पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुजयसिंह माने पाटील यांनी करून सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन संतोष साठे तर आभार अमरसिंह माने देशमुख यांनी मानले
पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविणार
माळशिरस भाजपात काही लोकांनी बंडाळीची आवई उठविल्यानंतर पालकमंत्री प्रथमच माळशिरस तालुक्यात आले होते. यावेळी माळशिरस भाजपाचे नेतृत्व कोण करणार ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे पाहत आगामी काळात निवडणुकांसाठी माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील, असे संकेत पाालकमंत्री गाेरे यांनी दिले.
माने पाटील परिवाराने गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी अहोरात्र काम केले असून, माळशिरस तालुक्यात माने पाटील परिवाराकडे श्रद्धेने व निष्ठेने पाहिले जाते. आपली श्रद्धा व निष्ठा व प्रामाणिकपणा अशी ओळख असणारा माने पाटील परिवार हा भाजपाच्या स्मरणात कायमच असेल, यामुळे माने पाटील परिवारासोबत राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व स्वतः राम सातपुते असतील. – राम सातपुते, माजी आमदार