'माळेगाव'च्या निवडणुकीत तिरंगी लढत; राष्ट्रवादीसह शरद पवार गट देखील मैदानात
बारामती : संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनेलसह, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत बळीराजा सहकार पॅनेल मैदानात उतरला आहे, त्याचबरोबर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजन कुमार तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनेलने सत्ताधारी गटाला आव्हान दिले आहे. या तिरंगी लढतीमुळे माळेगावची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (दि १२) शेवटचा दिवस असल्याने गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत बळीराजा सहकार पॅनलचे उमेदवार घोषित झाले, त्याचबरोबर चंद्रराव तावरे व रंजन कुमार तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलने देखील आपले उमेदवार घोषित केले.
दरम्यान माळेगाव कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. मात्र चंद्राराव तावरे व रंजनकुमार तावरे यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.