सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून पंतप्रधानपदावर आहेत पण ११ वर्षात त्यांनी जनतेल्या दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने पूर्ण न करणारे अधर्मी आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करावी यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचे निश्चित केले होते. गडचिरोलीत प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा व शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रतिभाताई धानोरकर, AICC चे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी माजी मंत्री अनिस अहमद, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार सुभाष धोटे, गडचिरोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात. स्टील सीटी करण्याच्या नावाखाली गडचिरोलीतील शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, स्थानिकांवर सुरा फिरवत आहेत. फडणवीस यांना गडचिरोलाचे फडणवीसस्थान करायचे आहे.
सुरजागडच्या खदानीला विरोध करू नये म्हणून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खदानीला विरोध करणार नाही, मोर्चात सहभागी होणार नाही असे लिहून घेतले जाते. विरोधात बातमी छापली तर कारवाई केली जाते. मुंबई ही मराठी माणसाची, कष्टकरी, गिरणी कामगारांची होती पण आज मुंबईत मराठी माणूस दुर्बिण लावून शोधावा लागतो तीच परिस्थिती गडचिरोलीची होणार आहे. प्रदुषण वाढेल, आपल्या संस्कृतीला धोका पोहचेल आणि या खदानीमुळे स्थानिक लोक हद्दपार होऊन परराज्यातील लोकांचे वास्तव्य वाढेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
१५ जून पर्यंत मशाल मोर्चे स्थगित
अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या विमानात २४२ प्रवासी व क्रू मेंबर होते. ही घटना अत्यंत दु:खद व धक्कादायक आहे. संपूर्ण देश शोकमग्न आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पुढचे दोन दिवस राज्यभर आयोजित केलेले मशाल मोर्चे स्थगित करून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : बाल सुधारगृहात एकाच्या खूनाचा प्रयत्न; दोरीने गळा आवळला अन्…