गडचिरोली : सुरजागड खाणीला विरोध होत असताना सत्ताधारी शासन प्रकल्पाचा विस्तार करत असून, आणखी खाणी प्रस्तावित आहेत. अशावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी कॉर्पोरेट सरकारसोबत गेल्याने ते उत्खननाच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप करत नक्षल्यांनी धर्मरावबाबा यांना याची किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी नक्षल्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघाचे धर्मरावबाबा आत्राम प्रतिनिधित्त्व करतात. त्यांनी अलीकडेच अजित पवार यांची साथ देत अन्न व औषध प्रशासन मंत्रिपद मिळवले. कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने दोन पानी पत्रक काढून धर्मरावबाबांना धमकी दिली आहे.
सूरजागड लोहखाणीला विरोध अधिक तीव्र करा, असे आवाहन करुन या प्रकल्पासह प्रस्तावित सहा लोह उत्खनन प्रकल्पांविरोधात भूमिका घेतली आहे. उत्खननाच्या सरकार असून या सरकारसोबत गेल्याने धर्मरावबाबा यांच्याविरोधात या पत्रकात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आत्राम आणि त्यांच्या सहकाऱ्याना आदिवासींचे जंगल, जमीन उध्वस्त केल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही पत्राद्वारे दिला.
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. सूरजागड प्रकल्पामुळे स्थानिक हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्याचा विकास हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे अशा धमक्यांकडे मी लक्ष देत नाही.
धर्मरावबाबा आत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री.