फोटो सौजन्य - Social Media
रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरात खंडणीसाठी धमकी दिल्याचा आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हर्ष भोलाराम चौधरी यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात शुभम पाटील, विराज राणे आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास अलिबाग-पोयनाड रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर असलेल्या बिकानेर स्वीट मार्ट या दुकानात घडली. फिर्यादी हर्ष चौधरी हे आपल्या काकांसमवेत दुकानात असताना, इनोव्हा कार (क्रमांक एमएच ४३ एएफ ०२९४) मधून दोन अनोळखी इसम दुकानात आले. त्यांनी चौधरी यांच्या काकांकडे “नवाराम” नावाच्या कामगाराबाबत विचारणा केली. काकांनी त्यांना सांगितले की तो बाहेर गेला आहे.
यावरून त्या इसमांपैकी एकाने धमकी दिली की, “इथे धंदा करायचा असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील. नाहीतर तुमच्या दुकानात खराब माल विकला जातो असा बनाव तयार करून सोशल मीडियावर बदनामी करू. जर हे टाळायचे असेल तर गुपचुप पैसे द्या, अन्यथा तुमचा कामगार आमच्या समोर हजर करा, नाहीतर त्याला राजस्थानला पाठवू.”
काकांनी पैसे देण्यास ठाम नकार दिल्यानंतर, दुकानात आलेल्या इसमांपैकी एका व्यक्तीने अचानक संताप व्यक्त करत त्यांच्या कानशिलात मारली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण झाले. त्यानंतर त्या इसमाने लगेचच आपल्या मोबाईल फोनवरून शुभम पाटील, विराज राणे आणि इतर एक व्यक्तीला फोन करून तातडीने दुकानात बोलावले. काही वेळातच हे तिघे सफेद रंगाच्या क्रेटा कारमधून घटनास्थळी दाखल झाले. दुकानात आल्यावर त्यांनी नवाराम या कामगारास ओळखून त्याच्यावर दबाव टाकत धमकावले आणि त्यालाही मारहाण केली. या प्रकारामुळे दुकानात उपस्थित सर्वजण घाबरून गेले.
त्यावेळी फिर्यादी हर्ष चौधरी यांच्या काकी यांनी हस्तक्षेप करत विचारणा केली असता, विराज राणे याने त्यांनाही शिवीगाळ केली आणि अपमानास्पद वर्तन केले. या सर्व प्रकारामुळे चौधरी कुटुंब भयभीत झाले असून, त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या गंभीर घटनेनंतर अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२/२०२५ अंतर्गत, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८(३), ३५२, ३५१(२), ११५(२), १८९(२), १९१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भुंडेरे करत असून, गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.