कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील लाल माती बेकायदेशीररित्या नवी मुंबईमध्ये नेवून पैसे कमावण्याचा धंदा सुरू आहे.या व्यवसायाला चाप लावण्याचे काम कर्जत तहसीलदार यांच्याकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे बसू लागला आहे.मात्र कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्य लगतचे जमिनीमधील झाडे झुडपे तोडून लाल मातीची तस्करीचे मुख्य केंद्र नांदगाव ग्रामपंचायत मधील चिमटेवाडी आहे.दरम्यान त्या ठिकाणी तब्बल वर्षभरापासून वन जमिनीमध्ये आणि काही खासगी जमिनीमध्ये लाल माती काढून विक्री केली जात असताना महसूल विभागला यांची माहिती नाही हे मोठे आश्चर्य ठरत आहे.चिमटेवाडी हे गाव कर्जत तालुक्यातील शेवटचे गाव असून या गावाच्या एका बाजूला ठाणे जिल्ह्याची हद्द तर गावाच्या मागे भीमाशंकर अभयारण्य यांची हद्द आहे. कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत मध्ये असलेल्या चिमटेवाडी कडे जाणारे रस्ते लाल माती वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे नादुरुस्त झाले आहे.
गेले वर्षभर या चिमटेवाडी मधील लाल मातीची तस्करी सुरू असून पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे.बळीवरे गावापासून पुढे मोहोपाडा गावाच्या नंतर चिमटे वाडी हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावाला भीमाशंकर अभयारण्य हद्दी मुळे अनेक बंधने आली आहेत.मात्र तालुक्यातील शेवटचे गाव असल्याने चिमटे वाडी कडे सरकारी अधिकारी फिरकत नसल्याने त्याचा फायदा लाल माती तस्कर यांनी उठवला आहे.रात्री नऊ ते पहाटे चार या वेळेत लाल माती घेवून जाण्यासाठी येणारे हायवा ट्रक यांची ये जा रात्रभर सुरू असताना बलीवरे मोहोपाडा आणि चिमटे वाडी मधील ग्रामस्थ झोप तरी कशी घेवून शकतात असा प्रश्न पुढे आला आहे.
चिमटेवाडी मधील मातीची तस्करी स्थानिकांच्या मदतीने सुरू असल्याचे बोलले जात आहे.तेथील काही तरुण गावातील लोकांना तुमच्या जमिनीचे बिनशेती मध्ये रुपांतर करून देतो असे सांगून त्या जमिनी मधील लाल माती काढून देण्यासाठी मदत करतात. त्याचवेळी या ग्रामपंचायत हद्दी मधील एक पांढऱ्या रंगाचा जेसीबी मशीन तेथील लाल माती काढण्यासाठी मदत करीत आहे.हे सर्व येथील स्थानिक उघड्या डोळ्याने पाहत आहेत त्याचे कारण या भागातील राजकीय वरदहस्त असलेली व्यक्ती कडूनच लाल माती काढून देण्यासाठी लाल मातीच्या तस्करांना मदत करीत आहे.
सरकारी अधिकाऱ्यांची पाठ आणि ट्रक गायब…
सरकारी अधिकाऱ्यांनी त्या सर्व गाड्यांचे व्हिडिओ चित्रण केलेले असताना देखील सरकारी अधिकारी गेल्यावर चिमटेवाडी मधून ते ट्रक बाहेर काढणारे स्थानिक असल्याने लाल मातीचा केंद्रबिंदू तब्बल एक वर्षांनी समोर आला आहे.आठ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजता कर्जत तहसीलदार यांच्याकडून चिमटे वाडी येथे धाड टाकण्यात आली त्यावेळी त्या गावाच्या बाहेर जंगलात एकाच ठिकाणी सात आणि अन्य ठिकाणी एक असे तब्बल आठ हायवा ट्रक उभे होते.त्या ट्रकचे चालक हे चिमटे वाडी गावांमधील एका नेत्याच्या घरात लपून बसले होते.तर सरकारी अधिकारी निघून गेल्यावर पहाटे पाच वाजता ते सर्व ट्रक चिमटे वाडी मधून सुखरूप बाहेर काढण्याची हिम्मत देखील त्या राजकीय वरदहस्त असलेल्या स्थानिक नेत्यांनी केली.
भीमाशंकर अभयारण्य भागात जावून खोदकाम…
लाल मातीचा हॉटस्पॉट बनलेल्या चिमटे वाडी मधील त्या दहा एकरातील जमिनीबद्दल महसूल खात्याला थांगपत्ता नाही याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. दुसरीकडे चिमटे वाडी गावाला लागून वन विभाग यांचे संरक्षित क्षेत्र असून भीमाशंकर अभियारण्य देखील लागून आहे.असे असताना या संरक्षित जमिनीमधील लाल माती गेल्या एका वर्षापासून काढण्याची हिम्मत नांदगाव ग्रामपंचायत मधील पुढारी करीत असल्याने प्रशासन सुप्त असल्याचे दिसून येत आहे.मात्र कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांच्याकडून स्वतः त्या जागेवर धाड टाकण्यात आल्यावर महसूल प्रशासन कामाला लागले आहेत असे दिसून येत आहे.
वन जमिनीचा देखील वापर..
नांदगाव, खांडस,ओलमन आणि पाथरज ग्रामपंचायती मधील लाल मातीची तस्करी होत असताना कधीही त्या भागात न फिरकणारे महसूल विभागाचे तलाठी जंगलात फिरून माती आणि गौण खनिज उत्खनन कुठे केले आहे याची मोजमापे घेवू लागले आहेत.मात्र त्यात अनेक तलाठी यांना मोजमापे घेताना मोठ्या अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.माती उत्खनन करताना अनेक ठिकाणी जमिनीचे मालक यांचा थांगपत्ता नाही तर काही ठिकाणी वन जमिनीचा वापर लाल माती काढण्यासाठी केला आहे.
यात सर्वात महत्वाचे म्हणजे गेली वर्षभर काढली जाणारी लाल माती ही शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल भरून स्वामित्व शुल्क भरून काढण्यात आलेली आहे हे सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर कर्जत तालुक्यातील लाल मातीची तस्करी सुरू असल्याचे चर्चा सुरू असताना आपल्यापैकी एकाही तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडून दंडात्मक कारवाई होऊ शकली नाही.ज्या ठिकाणी की रात्रीच्या वेळी जावून कारवाई करू शकलो त्या ठिकाणी तुम्ही दिवसा देखील जात नाही आणि दंडात्मक कारवाई करीत नाहीत याचे आश्चर्य वाटत असल्याची खुली तक्रार तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या बैठकीत केली.तुम्ही दिवसा जावून तालुक्यातील प्रत्येक ठिकाणचे अपडेट गोळा करून आठ दिवसात सर्व ठिकाणचे पंचनामे पूर्ण करून कारवाई करावी असे आदेश तहसीलदार यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.