मंचर : राज्यात गारपीटी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडणार असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी कोल्हारवाडी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे, प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, संचालक सचिन पानसरे, शरद बँकेचे संचालक संतोष धुमाळ, सरपंच मनीषा तोत्रे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, कैलास तोत्रे, विकास बारवे, तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.
पंचनामे करण्याचे आदेश
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रविवारी वादळी पाऊस व गारपीट झाले असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे झाल्यानंतर किती नुकसान झाले याचा अंदाज घेऊन याबाबत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
रब्बी हंगामातील पिके भुईसपाट
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार येथील कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ तर पूर्व भागातील वडगाव पीर, लोणी, धामणी, पोंदेवाडी या भागात मोठ्या प्रमाणात गारपिट होऊन शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा, बटाटा, गहू, ज्वारी रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे भुईसपाट झाली आहे.
[blockquote content=”तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुन पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ” pic=”” name=”-दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री”]