
काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश; जतमधील राजकीय समीकरणे बदलणार
जत : जत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. २०१७ मध्ये काँग्रेस पक्षाकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या व पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेणावर तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक बन्नेणावर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जतच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नगराध्यक्ष पद हे खुले झाल्याने अशोक बन्नेणावर यांनी पुन्हा निवडणुकीसाठी तयारी दर्शवली होती. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती, मात्र पक्षात कोणताही निर्णय न झाल्याने त्यांनी पत्नीसमवेत भाजपचा झेंडा हातात घेतला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे जतमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या गोटात नाराजी निर्माण झाली असून, भाजपसाठी ही मोठी ताकद वाढली असल्याचे मानले जाते.
यावेळी अशोक बन्नेनवर म्हणाले, गेल्या पंचवार्षिक काळात जत शहराच्या विकासासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले. काँग्रेसकडे सत्ता असताना अनेक विकासकामे केली, मात्र सत्तेच्या अभावामुळे ती थांबली. त्यामुळे ‘सत्तेशिवाय विकास शक्य नाही’ हे लक्षात घेऊनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, आम्हाला विरोधासाठी विरोध करायचा नाही. जत शहराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय आम्ही ठेवले आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर असून, भाजप सरकार जनतेच्या हितासाठी ठामपणे काम करत आहे. नागरिकांनी भाजपच्या पाठीशी राहावे.”
या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, अण्णा भिसे, चंद्रशेखर गोब्बी, सरदार पाटील, सुभाष गोब्बी, परशुराम मोरे, विक्रम ताड, संतोष मोटे, रवी मानवर, बंटी नदाफ, सुभाष कांबळे, किरण शिंदे, अनिल पाटील, अरुण साळे, प्रकाश मोटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते