टोरेस घोटाळ्यातील म्होरक्या युक्रेनमध्ये
मुंबई : मुंबईत काही दिवसांपूर्वी टोरेस कंपनी घोटाळा समोर आला होता. यामध्ये १५ हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांची सुमारे १४२ कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणातील मास्टरमाईंड आणि मुख्य आरोपी युक्रेनमध्ये असल्याचे पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुंबईसह मिरा-भाईंदर, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांची फसवणूक यामध्ये झाली आहे.
टोरेस घोटाळ्यात परदेशी नागरिकांचा हात असल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी जानेवारी २०२५ मध्ये केला होता. या टोळीचा म्होरक्या इगोर युर्चेन्कोव्ह हा आरोपी युक्रेनमध्ये सापडला असून, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आता त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेशी समन्वय साधून केंद्र सरकारमार्फत ही प्रत्यार्पण प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीनं जारी केलेल्या ‘ब्लू कॉर्नर’ नोटीसच्या आधारावर टोरेस घोटाळ्याचा मास्टरमाईंड इगोर युर्चेन्कोव्ह हा सध्या युक्रेनमध्ये असल्याची माहिती तेथील स्थानिक पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली आहे.
दादर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा
कंपनीचे मुख्य कार्यालय असलेल्या दादरच्या शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार अशी आरोपींची नाव आहेत. टोरेस कंपनीने १३ कोटी ४८ लाख १५ हजार ०९२ रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
इंटरपोलमार्फत प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिस करणार विनंती
लवकरच इंटरपोलमार्फत युक्रेन सरकारकडे इगोरच्या अधिकृत प्रत्यार्पणाची विनंती केली जाणार असून, त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांचे युक्रेनमधील स्थानिक भाषेत भाषांतरही करण्यात आले आहे. केंद्रीय विभागांच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे, आरोपीविरोधातील पुरावे युक्रेनमधील यंत्रणांना पाठवण्यात येणार आहेत. युक्रेनकडून माहिती मिळाल्यानंतर सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
अनेकांनी गुंतवले लाखो रुपये
सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा लोकांना दिला होता. त्यामुळे गुंतवणुकदारांचा टोरेसवर विश्वास बसला. यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले. मात्र, एका दिवशी अचानक परतावा मिळणे बंद झाले आणि मुंबई, नवी मुंबई, भाईंदर यांसह ठिकठिकाणी असलेल्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांची मोठी गर्दी जमा झाली.