Traffic disrupted due to a large tree falling on Kas Road in Satara
कास पठार : राज्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यामध्ये मान्सून 12 दिवस आधी आल्यामुळे तुफान पाऊस कोसळत आहे. कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस झाला आहे. सातारा, बारामती आणि सिंधुदुर्गामध्ये मोठा पाऊस झाला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी झाडपडीची घटना घडली आहे. साताऱ्यामधील कास रोडवर भले मोठे झाड कोसळले आहे.
गेल्या चार-पाच दिवसापासून कास पठार परिसरात मुसळधार पाऊस त्याचबरोबर जोराचा वारा वाहत होता. यामुळे सातारा कास रोडवरील देवकल गावच्या पुढच्या साईटला भले मोठे झाड सातारा कास मुख्य रस्त्यावर पडले. त्यामुळे सातारा कास मार्गावरील दोन्ही साईटची वाहतूक काही काळ बंद झाली होती. सकाळची साताऱ्यातून सुटणारी गोगवे गाडी ही जागेवरच थांबली होती. त्यावेळी देवकल गावातील मंडप डेकोरेशनचे व्यवसाय करणारे संतोष साळुंखे यांना ही माहिती मिळताच तातडीने ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सर्वांच्या सहकार्याने झाड हटवण्यासाठी प्रयत्न करून झाड हटवल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सातारा कास रस्त्यावर देवकल गावच्या पुढे वनविभागाचे हद्द येत असल्याने वनविभागाच्या हद्दीमध्ये बरीच झाडे असून रस्त्यावरती वाकलेल्या स्थितीत आहेत. याबाबत वनविभागाला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवून सुद्धा वन विभाग याबाबत काही करत नसल्याने या मार्गावरून पावसाळ्याच्या दिवसात प्रवास करणे धोक्याचे आहे. बरीच झाडे वाकलेल्या स्थितीत असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पडून एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामध्ये जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे. याबाबत जीवितहानी झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे असे मत इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. देवकल ते अटाळी गावच्या दरम्यान जेवढी वन विभागाच्या हद्दीत रस्त्यावर वाकलेल्या स्थितीत झाडे आहेत ती ताबडतोब काढून घ्यावीत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईमधील प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अलर्ट दिला आहे. सोमवारी (दि.26) राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई शहर, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला यलो अलर्ट दिला आहे. तसेच नाशिकला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचे तसेच विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल अधिक वेगात सुरू आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.