
डिजीटल जनगणनेची जळगावात तयारी
जळगाव: देशात लवकरच पहिली डिजीटल जनगणना होणार आहे. त्याआधी पूर्वचाचणीसाठी चोपडा तालुक्याची निवड करण्यात आली असून २६ गावांसाठी ९५ प्रगणक व १६ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचा तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. चोपडा येथे घरयादी व घरगणना पूर्वचाचणी (एचएलओ) साठी प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. निरुपमा डांगे, (भा.प्र.से.) संचालक, जनगणना संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या वेळी डॉ. डांगे यांनी घरयादी व घरगणना पूर्वचाचणी संदर्भात सविस्तर माहिती दिली.
२०२७ ची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे. यासाठी महाराष्ट्राततीन ठिकाणी पूर्वचाचणी घेण्यात येणार असून त्यापैकी चोपडा तालुक्यातील २६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या पूर्वचाचणीत येणाऱ्या समस्या, अडचणी तसेच मोबाईल अॅपच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून २०२७ च्या जनगणनेच्या तयारीसाठी आवश्यक तपासणी केली जाणार आहे. या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार तथा चार्ज अधिकारी भाऊसाहेब थोरात, वीरेंद्र दीक्षित (सहसंचालक), सागर बागुल (उपसंचालक), अजय ठाकूर (सहाय्यक संचालक तथा जनगणना अधिकारी), संजय नाईक, विशाल दिवेकर, श्रीकांत बनकर, मयूर पवार, प्रणय कडू, आशिष यादव, प्रदीप सिंग, प्रणय कड़कर तसेच निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील उपस्थित होते.
पेन आणि कागद नाहीच
देशभरात २०२६-२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी केंद्र सरकारने काही राज्यांमधील निवडक तालुके डिजिटल जनगणनेसाठी निवडले आहेत. या पायलट प्रकल्पात चोपडा तालुक्यातील २६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. इतिहासात प्रथमच जनगणना डिजिटल माध्यमातून पार पडणार असून यामध्ये मोबाईल, टेंब आणि लॅपटॉपच्या सहाय्याने माहिती संकलन केले जाईल. यापूर्वीच्या सर्व जनगणनांमध्ये पेंड, पेन आणि कागदाचा वापर करण्यात येत होता.
नकाशा अंतिम करण्याचे काम सुरू
चोपडा तालुक्यातील आदिवासी, डोंगराळ तसेच मोठ्या गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात नकाशा अंतिम करण्याचे काम सुरू असून त्यानंतर घरांची यादी तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रगणन क्षेत्रात साधारण १५० ते २०० घरे आणि सुमारे ७०० ते ८०० लोकांचा समावेश असेल.
Jalgaon Crime : लग्नाचे अमिश देऊन लैंगिक शोषण! अखेर जळगावमधील वादग्रस्त पोलीस निरीक्षक निलंबित
या गावांमध्ये होणार प्रगणना
अडावद, खाऱ्यापाडाव वैजापूर, मुळयावतार, शेनपाणी, कर्जाणे, मेलाणे, देव्हारी, देवझिरी, बोरमळी, मालापूर, विरवाडे, विष्णापूर, वडती, अंबाडे, खरग, नारोद, बोरखेडा, वर्डी, रूखणखेडा प्र.चो., मालचे, तावसे खु., मंगरूळ, लोणी, पंचक, रूखणखेडा प्र.अ.
जनगणना अधिकारी जेव्हा आपल्या घरी माहिती विचारतील, तेव्हा त्यांनी अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे – भाऊसाहेब थोरात, तहसीलदार