
Tripurari Pournima a food court of 521 items at Dagdusheth Halwai Ganapati mandir Pune News
Tripurari Purnima : पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सर्वत्र मोठा उत्साह आहे. सर्व प्रमुख मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केला जातो. विविध पद्धतीचे दिवे लावून आरास केली जाते. त्याचबरोबर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये त्रिपुरारी वात जाळली जाते. पुण्यामध्ये देखील त्रिपुरारी पौर्णिमेचा मोठा उत्साह दिसून येत आहे.
पुण्यातील लोकप्रिय श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात देखील त्रिपुरारी पौर्णिमेचा मोठा उत्साह दिसून येत आहे. लाडक्या दगडूशेठ हलवाई गणरायासमोर अन्नकोट साकारण्यात आले आहे. या अन्नकोटाच्या माध्यमातून दगडूशेठ हलवाई गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाचे पदार्थ बाप्पाला अर्पण करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबत मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला.
यावेळी बोलताना ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, “त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे भाविकांना करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ५२१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. तसेच बळीराजावर जे संकट आले आले, ते दूर होवो आणि महाराष्ट्र व संपूर्ण भारतात सुख-शांती नांदो अशी प्रार्थना यावेळी गणरायाचरणी करण्यात आली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ५२१ पदार्थांचा महानैवेद्य बाप्पाला दाखविण्यात आला. यावेळी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. ही आरास पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली आहे. त्याचबरोबर काल (दि.04) दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव देखील साजरा करण्यात आला. अतिशय देखण्या पद्धतीने संपूर्ण मंदिराच्या कळसावर दिवे लावण्यात आले होते. त्यानंतर आता अन्नकोट करण्यात आले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हा उत्साह पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी जमली आहे.