शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा करुन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या (फोटो - एक्स)
Uddhav Thackeray Marathwada tour: बीड: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेलेल पीक गेल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला. यामध्ये राज्य सरकारने कर्जमाफी न दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे आजपासून (दि.05) चार दिवस मराठवाडा दौर्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पैठण तालुक्यातील नांदर गावात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून नुकसानीचा आणि सरकारी मदतीचा आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नांदर गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली अतिवृष्टी नुकसानीची भरपाई प्रत्यक्षात किती मिळाली, मिळाली की नाही, याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी उद्धव ठाकरे यांनी संवाद देखील साधला. ते म्हणाले की, “मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलो नाही. तुम्ही सर्व कंटाळला आहात. दरवेळी निवडणुका आल्यावर आम्ही राजकीय नेते येतो. तुमच्या कोपराला गुळ लावून जातो. तुम्ही भोळेभाबडे आहेत. स्वप्न दाखवलं की बळी पडता आणि आपलं आयुष्य देऊन टाकता. मराठवाड्यावर गेल्या वर्षभरात आपत्तीवर आपत्ती येत आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाही. कधी नव्हे ते एवढं मोठं संकट मराठवाड्याने अनुभवलं आहे. ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सांगितलं असा पाऊस पाहिला नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझ्या दौऱ्याची टिंगल केली. मी शेतकऱ्यांशीच बोललो. तुमची मागणी मांडली. एक तर हेक्टरी ५० हजार मिळाले पाहिजे ही मागणी बरोबर की चूक तुम्हीच सांगा. थकीत कर्ज फेडणार कसं. हातातील पिक गेलं. खरीप गेलं. रब्बी कसं घेणार जमीन खरडून गेलं आहे. गेल्या आठवड्यात काही तरी होईल वाटलं होतं. सर्व एकजूट झाले होते. परत मुख्यमंत्र्यांनी गुळ लावला, कर्जमाफी करण्या आधी माती तर द्या. मग कर्ज द्या. मी हा विषय सोडणार नाही. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत राहणार. केंद्रीय पथक फिरतंय. दिवाळीच्या आत पैसे देणार होते. दिवाळी झाली. तुळशीचं लग्न झालंय. पंचांग काढत आहेत. मुहूर्तमागे मुहूर्त काढत आहेत. पण मदतीच्या नावाने बोंबाबोंब. आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत. आम्हाला जूनची मुदत मान्य नाही. कर्जमुक्ती करा. आताच्या आता कर्जमुक्ती करा,” तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्या, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.






