'दारू पितो, दहशत माजवतो, अन् महिला'; तृप्ती देसाईंचे भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी भाजपाचे उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नितीन दिनकर यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Eknath Shinde : 18000 शाळा होणार बंद? विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले
देसाई यांनी दावा केला की, काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेकडे तक्रारी केल्या आहेत की नितीन दिनकर हे पद देण्याच्या बहाण्याने महिलांना एकट्याने भेटायला बोलावतात, आणि त्यांच्यावर अशोभनीय वर्तन करण्यासाठी दबाव टाकतात. विशेष म्हणजे, श्रीरामपूरजवळील एका ढाब्यावर दिनकर दारू पिऊन मित्रांसोबत डान्स करत होते आणि त्याच ठिकाणी महिलांनाही जबरदस्तीने डान्स करायला लावल्याचा व्हिडिओ देखील त्यांच्याकडे असल्याचा दावा देसाईंनी केला आहे.
नितीन दिनकर यांना पोलीस सुरक्षा असल्याने ते दबदबा निर्माण करतात आणि जे कोणी त्यांच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करतात. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते निकटवर्तीय असल्यामुळे कोणीही उघडपणे विरोध करण्यास धजावत नाही, असे गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केले आहेत.
दरम्यान, नितीन दिनकर यांनी तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप फेटाळून लावत तृप्ती देसाई यांच्यावरच बदनामीचा आरोप केला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की व्हायरल व्हिडिओ हा त्यांच्या भाचीच्या वाढदिवसाचा असून, तो एक घरगुती कार्यक्रम होता. “हा कार्यक्रम मी स्वतःच सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो कुठलाही आक्षेपार्ह प्रकार नव्हता. 14 महिन्यांपूर्वीच्या व्हिडिओचा संदर्भ देऊन बदनामी करण्याचा डाव रचला जात आहे. मी याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे,” असे दिनकर यांनी म्हटलं आहे. या सगळ्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील भाजपच्या अंतर्गत गटबाजीवर देखील चर्चा सुरु झाली आहे. आता मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.