भाईंदर/ विजय काते : सध्या हिंदी सक्तीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. याचपार्श्वभूमीवर मीरारोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाराच्या कानशिलात लगावली होती. मिरारोड मध्ये मनसैनिकांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकान मालकास चांगला चोप दिला आहे.मिरारोडच्या बालाजी हॉटेल जवळ ही घटना घडली आहे.मिरारोडचे उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांनी दुकान चालकाच्या कानशिलात लगावली आहे.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिरोरोड येथील एका हिंदी भाषिक दुकानाला मालकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.दुकान मालकाने मराठी भाषा बोलण्यास नकार दिला.यावेळी आपण ज्या राज्यात नोकरी व्यवसाय करता,त्या भाषेचा आदर का करत नाही असे अनेक प्रश्न मनसैनिकांनी विचारले.योग्य उत्तर दुकान मालकाकडून न मिळाल्याने मनसैनिकानी चांगलच चोप दिला.
मीरारोडच्या शांती पार्क परिसरातील जोधपूर स्वीट्स अॅण्ड नमकीन या दुकानाच्या मालकास मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत आज संपूर्ण मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आपला संताप व्यक्त केला.ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता भविष्यात कोणत्याही व्यावसायिकासोबत घडू शकते, अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून आज शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.
व्यवसायिकांनी सकाळपासून सेवेन स्कूल (मिरा रोड पूर्व) येथून सुरू करून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली. रॅलीत शेकडो व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला असून “व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची गॅरंटी कोण घेणार?”, “मनमानी गोंधळ सहन केला जाणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.या प्रकाराला आळा घालावा आणि भविष्यात कोणत्याही व्यापाऱ्याच्या सुरक्षेला बाधा येऊ नये यासाठी पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांच्या संघटनांकडून देण्यात आली आहे.घटनेने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून शांतता राखत योग्य कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही काही व्यापाऱ्यांनी दिला आहे.
या मारहाणीच्या घटनेवर पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, “फक्त गुन्हा दाखल करून भागणार नाही, जबाबदारी स्वीकारून ठोस पावले उचलावी लागतील.”या घटनेचा परिणाम शहरातील व्यावसायिक एकजुटीवर झाला असून, भविष्यात अशा प्रकारांचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस सुरक्षा योजना लागू करण्याची मागणी वेग घेऊ लागली आहे.