जेजुरी : जेजुरी येथील विटभट्टी परिसरात टीपर वाहनातील दोन बॅटरी चोरून घेऊन जाताना जेजुरी एमआयडीसी चौकात नीरा येथील दोघा चोरट्यांना जेजुरी पोलिसांनी मुद्देमालासह पकडले. या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. अक्षय दिलीप शेवाळे (वय २३) व तेजाब जमीर खान ( वय ३५, दोघे रा. निरा ता. पुरंदर) या दोघा आरोपींना जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनी जेजुरी बल्लाळेश्वर मंदिरा शेजारी फिर्यादी सुमित पोपट जगताप यांचा वीट भट्टीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे वाहतूक करण्यासाठी टीपर हे वाहन आहे. दिनांक २२ रोजी या वीट भट्टी शेजारी चालकाने टीपर वाहन लावले. दि २३ रोजी सकाळी हे वाहन चालू होत नसल्याने गाडीची पाहणी केली असता या गाडीतील दोन बॅटरी चोरीला गेल्याचे आढळून आले. याबाबत सुमित जगताप यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २३ रोजी पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे यांच्यासह पोलीस पथक गस्त घालत असताना जेजुरी एमआयडीसी चौकातून दोन व्यक्ती दुचाकी गाडीवर मध्ये काहीतरी वस्तू ठेवून त्यावर कापडाने झाकून जात होते. पोलिसांना संशय असल्याने, त्यांनी या दोघांना थांबवून तपासणी केली असता दुचाकी गाडीवर दोन बॅटरी आढळून आल्या. पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक करून त्यांनी चोरलेल्या सुमारे ३३ हजार रुपये किमतीच्या दोन बॅटरी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत झेंडे, संदीप मोकाशी, पोलीस हवालदार विठ्ठल कदम, संतोष मदने, दीपक काशीद, प्रवीण शेंडे, हरीचंद्र करे, पोलीस मित्र नाना घोगरे यांनी ही कारवाई केली.
दोन दिवसांपूर्वी जेजुरी पोलिसांनी गाई चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले होते. तर या आठ दिवसात अनेक अवैध धंद्यावर कारवाई केली आहे. सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, चोरी, मारामारी असे गुन्हे दाखल असून, यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.