
संग्रहित फोटो
यामध्ये काँग्रेसचे एक माजी राज्यमंत्री असल्याची जोरदार चर्चा असून, मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दुसरे पदाधिकारी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील असून, त्यांनी यापूर्वी भाजपविरोधात निवडणूक लढविली होती. त्यांच्या प्रवेशाला स्थानिक पातळीवर विरोध असला तरी, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने तो डावलून प्रवेशास हिरवा कंदील दिल्याचे समजते.
महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवत भाजपने नियोजनबद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बीडकर यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे देण्यात आली आहेत. ज्या प्रभागांत भाजपची ताकद तुलनेने कमी आहे, तेथे इतर पक्षांतील माजी नगरसेवक व प्रभावी पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा आराखडा आखण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरद पवार गट) तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षातील माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विरोधी पक्षांत अस्वस्थता वाढली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अर्जविक्रीच्या पहिल्या दोन दिवसांत हजारो इच्छुकांनी अर्ज घेतले असले तरी प्रत्यक्ष दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप संथ आहे. आज होणाऱ्या काँग्रेसच्या या प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे अधिक बदलण्याची चिन्हे असून, महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.