
सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा प्रवेश मध्यरात्री बालाजी सरोवर हॉटेलमध्ये झाला. या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या भाजप प्रवेशामागे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांची निर्णायक भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच हा प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे शहर मध्य भागात भाजपाची ताकद वाढली आहे.
प्रवेशावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाच्या आक्रमक राजकीय खेळीमुळे सोलापुरातील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
विश्वासात न घेता माजी नगरसेविकेचा प्रवेश
आम्हाला विश्वासात न घेता शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी एमएआएम पक्षाच्या माजी नगरसेविका पुनम बनसोडे आणि अजित बनसोडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने आम्ही भाजपात पक्ष प्रवेश केल्याचे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी सांगितले.
ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्षवाढीचे आक्रमक धोरण राबवत शहरातील राजकीय हालचालींना वेग दिला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, काँग्रेसमधील दोन प्रमुख पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसचे एक माजी राज्यमंत्री असल्याची जोरदार चर्चा असून, मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दुसरे पदाधिकारी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील असून, त्यांनी यापूर्वी भाजपविरोधात निवडणूक लढविली होती. त्यांच्या प्रवेशाला स्थानिक पातळीवर विरोध असला तरी, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने तो डावलून प्रवेशास हिरवा कंदील दिल्याचे समजते.