Khed Accident: धावत्या दुचाकीचे चाक निखळले अन्...; खेडमधील भीषण अपघातात एकाचा करूण अंत
खेड: तालुक्यातील भरणे नजीकच्या जगबुडी पुलाजवळ शुक्रवार दि.१ ऑगस्ट रोजी सायंकाळी दुचाकी अपघातात एक युवक जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुचाकी मुंबईच्या दिशेने जात असताना वेगामुळे अपघात झाला. स्वरूप संदीप सागवेकर ( वय वर्षे – १७ , समर्थकृपा बिल्डिंग,वेरळ , ता.खेड) असे जागीच मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे तर यथार्थ सकपाळ (वय वर्षे या १६ , रा. बिजघर, ता.खेड ) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचा वेग प्रचंड होता. वेग इतका होता की गाडीचे पुढील चाक तुटून रस्त्यावर दूर जाऊन पडले. त्यामुळे गाडीवरील दोघेही जोरात फेकले गेले. यामध्ये स्वरूप सागवेकर या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक यथार्थ सकपाळ हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा होत आहे. परशुराम घाट असो किंवा अन्य इतर ठिकाणी सतत होणाऱ्या अपघातामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. मुंबई गोवा अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोवा महामार्गावर कोलेटी गावाजवळ शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास एसटी व ट्रकचा अपघात झाला.
या अपघातात ट्रक चालकाचा पाय तुटला आहे. या अपघातात ट्रकच्या चालकाकडील बाजूचा भाग आत मध्ये ठोकला गेला, त्यामुळे चालकाचा पाय त्यामध्ये अडकला होता. ताबडतोब स्थानिकांच्या मदतीने ठोकलेल्या एसटीला लोखंडी साखळदंड लावून ट्रकचा आतमध्ये घुसलेला भाग खेचण्यात आला आणि ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर चालकाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एसटी बसमधील प्रवाशांना सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र ट्रक गंभीर धडक बसल्यामुळे ट्रकचा चेंदामेंदा झाला आहे. यात ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय तुटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सध्य़ा या ट्रकचालकावर उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच परशुराम घाटात दरड कोसळली होती. पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोका आणखी वाढला असल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. यावर ताप्तुरती उपाययोजना म्हणून दरडीकडील मार्ग पुर्णपणे बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे.