वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप (संग्रहित फोटो)
धुळे : शहरातील साक्री रोडवरील एका वसतिगृहात नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. योगेश मिला गोयेकर (रा.बेहरगाव फाटा, ता. साक्री) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे नातलगांनी वसतिगृह व शाळा प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
योगेश हा साक्री रोडवरील विद्यावर्धिनी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होता आणि समोरील लिलावती मागासवर्गीय वसतिगृहात राहात होता. मंगळवारी सकाळी त्याची प्रकृती अचानक खालावली. त्याला अगोदर जिल्हा रुग्णालयात, नंतर खासगी रुग्णालयात व शेवटी मेंदूविकार तज्ज्ञाकडे दाखल करण्यात आले. मात्र, कोणतीही सुधारणा न झाल्याने योगेशला एमआरआयसाठी जुने सिव्हिल हॉस्पिटलसमोरील केंद्रात नेण्यात आले. तेथील तपासणीनंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : Pranjal Khewalkar: मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात प्रांजल खेवलकरांना कोर्टाचा दिलासा, जामिनाचा मार्ग मोकळा?
योगेशच्या मृत्यूनंतर नातलगांनी जोरदार आक्रोश व्यक्त करत वसतिगृह व शाळा प्रशासनाने वेळेवर योग्य उपचार न केल्याचा आरोप केला. योगेश सकाळपासून आजारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
तसेच डॉक्टरांनीही उपचारात दिरंगाई केली, असा दावा नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे शवविच्छेदन इन-कॅमेरा करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक दीपक पाटील आणि पथकाने रुग्णालयात भेट दिली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
आंबेगाव पठार येथे तरुणाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, सिंहगड रोड परिसरातील धायरीतील खुनाची घटना ताजी असतानाच आणखी एक खून झाल्याची घटना पुण्यात घडली. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात सात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने आणि त्यांच्या साथीदारांनी जुन्या वादातून एका तरुणाचा तीक्ष्ण शस्त्रांनी सपासप वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार कात्रज येथील जैन मंदिराजवळील चाळीच्या परिसरात घडला आहे. टोळक्याच्या या हल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.