मराठा आरक्षणावरुन मातोश्रीच्या सुरक्षेमध्ये वाढ
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रकाशझोतात आलेला आहे. आरक्षणावरुन विरोधकांसह सत्ताधारी विविध भूमिका घेत आहे. मागील अनेक महिन्यांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे अनेकदा उपोषणावर बसलेले आहे. मात्र तरीही समाधानकारक निर्णय न झाल्यामुळे मराठा सामज आक्रमक झाला आहे. आता मराठा समाज थेट मातोश्री बंगल्यावर येऊन धडकला आहे. शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चा आज मातोश्रीवर धडकणार
मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यासाठी आणि आरक्षणाबाबत बोलणी करण्यासाठी मराठा नेते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी अर्थात मातोश्रीवर काल (दि.29) दाखल झाले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिला नाही. यामुळे आंदोलकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सकल मराठा समजाच्या पदाधिकारी व आंदोलक यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठा पदाधिकाऱ्यांची भेट न घेता मातोश्रीबाहेर गेल्याने मराठा समाज नाराजी व्यक्त करत आहे. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा क्रांती ठोक मोर्चा आज मातोश्रीवर धडकणार आहे.
मातोश्रीवर पोलीस बंदोबस्तात वाढ
याच पार्श्वभूमीवर मातोश्री बंगल्याबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे. कालपासून पदाधिकारी व आंदोलक मातोश्री बाहेर असून उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली नसून त्यांना भेट देखील दिली नाहीये. आज मराठा क्रांती ठोक मोर्चा मातोश्रीबाहेर आंदोलन करत असल्यामुळे पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच शरद पवार यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट न केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.