मुंबई: Devendra Fadnavis Birthday: आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी अनेक विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन केले. दरम्यान राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते मुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळचे महायुतीचे सहकारी असलेले उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्र नायक’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना देखील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
गंगाधर फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक आदर्श राजकारणी म्ह्णून आपली प्रतिमा निर्माण केली होती. त्यांचा वारसा देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे अत्यंत मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य करत आहेत. देवेंद्र फडणवीस आज राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. २०१४ ते २०१९ या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ, राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला.
नंतरच्या कालावधीत विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची त्यांची धडपड पाहता आली. देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. त्यांना आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. २०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केली. यामुळे त्यांच्या पक्षात त्यांची विश्वासहर्ता वाढली.
देवेंद्र फडणवीस यांना भविष्यात केंद्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य त्यांच्या पक्षाला उपयुक्त ठरेल. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे. भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांमध्ये यश मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!
दरम्यान हा लेख उद्धव ठाकरे यांनी गिरीश महाजन यांच्या महाराष्ट्र नायक यांच्या कॉफी टेबल बुकमध्ये लिहिला आहे. मात्र या लेखामुळे आणि गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली भेट आणि फडणवीस यांनी विधानसभेत दिलेली ऑफर यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली आहे.