'गुजरातमध्ये ज्याचा जन्म झाला तो म्हणजे औरंगजेब'; उद्धव ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे?
बलाढ्य सत्तेला नमवून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही त्याला जिंकता आला नाही. महाराजांपासून स्फूर्ती घेतलेले संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणींनी त्याला मूठमाती दिली. थोडक्यात सांगायचं झालं तर औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. म्हणजेच ज्याचा गुजरातमध्ये जन्म झाला तो म्हणजे औरंगजेब, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याची चर्चा राज्यभर रंगली आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात सोमवारी रात्री दोन गटात राडा झाला. त्याचे पडसाद आज राज्यभर उमटत आहेत. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून आज सरकारवर कडाडून टीका केली आहे. औरंगजेबाजी कबर हटवण्यासाठी कोणाची परवानगी हवी आहे? सरकार ती हटवत का नाही? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कबरीला संरक्षण पुरवणाऱ्या सरकारचा औरंगजेब कोण लागतो? असा संतप्त सवाल केला आहे.
त्यामुळे औरंगजेबाची कबर उखडून टाकायची कोणी भाषा करत असेल तर नुसती आंदोलनं करण्यापेक्षा, ते डबल इंजिन सरकार आहे, ते नुसतं वाफा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे. म्हणजे केंद्र सकार संरक्षण देणार असेल, तर केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भाजपला आम्ही विचारतो की, औरंगजेब तुमचा कोण लागतो. आणि दुसरी गोष्ट अशी की औरंगजेब असो अफजल खान असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे हे पुरावे आहेत. ते जर त्यांना हटवावे वाटत असतील तर ती कबर तुम्ही हटवा. आणि तो सोहळा करणार असाल तर नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा, असा टोला त्यांना सरकारला लगावला आहे.
आरएसएसचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे, मग हिंदू खतरे में, कसा काय? मग इतकी वर्ष तुम्हा काय केला? आणि हा प्रकार पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृहखातं झोपा काढत होतं का? हा कट तुमच्या कानावर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? असे अनेक प्रश्न त्यांनी सरकारला विचारले आहेत. या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सरकार त्याचं अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला जर हिरव्या रंगाचा इतका राग असेल तर पहिला तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग हटवून दाखवा. एका बाजूला हिंदूस्तान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तानसोबत दुबईत मॅच खेळायची. ही मॅच यांची पोरंटार जाऊन बघणार. अमित शहांचा मुलगा ही मॅच आयोजित करणार. इकडे गरिबांच्या मुलांना हिंदू मुसलमान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत मॅच बघायची हे हिंदुत्त्व कोणतं, असा सवालही त्यांनी केला आहे.
बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत असताना शेख हसिनांना देशात आश्रय देता. आणि त्याच बांगलादेश सोबत क्रिकेट मॅच खेळायची. म्हणजे सर्वसामान्यांच्या घरांची होळी करायची आणि राजकारण्यांनी पोळी भाजायची, हे घृणास्पद राजकारण आहे. आमच्या राजांच्या पराक्राची प्रतिकं, पुरावे काढायचे आणि कोणाही ऐऱ्या गैऱ्याशी तुलना करायची. कोरटकर मोकाट सुटले आहेत. त्याला का पकडत नाहीत. सोलापूरकर, कोश्यारी होते. त्यांच्यावर कोणती कारवाई नाही. एकीकडे शिवाजी महाराजांचा अवमान करायचा आणि दुसरीकडे औरंगजेबाची विषय काढून आमच्यात दंगली लावून द्यायच्या. त्यामुळे कर्तुत्वहीन माणसाशी शिवाजी महाराजांची तुलना करणाऱ्या एकालाही भर रस्त्यात फटकवलं तर पुन्हा कोणी हिंमत करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.