
Ujjani Dam, Water Crisis, El Nino, Maharashtra Monsoon
गतवर्षी समाधानकारक पावसामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले होते. डिसेंबर अखेर धरणात तब्बल ११३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यावेळी धरण पूर्ण भरल्याने अतिरिक्त पाणी नदीपात्रातून सोडण्याची वेळ आली होती. मात्र, यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात शेतीसाठी कालव्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. तसेच २३ एप्रिलपासून भीमा नदीतही विसर्ग करण्यात आला. सध्या कालव्यांमधील आणि नदीतील विसर्ग बंद करण्यात आला असून करकंब परिसरातील काही भागातच कालव्यातील पाणी सुरू आहे. मात्र, १० जूननंतर धरणातील पाणी पूर्णतः पिण्याच्या गरजांसाठी राखीव ठेवले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.
१ मे रोजी धरणात ५५.५७ टीएमसी मृत पाणीसाठा (उणे १५.११ टक्के) होता. महिनाभरात त्यात आणखी घट होऊन ३१ मे रोजी तो ५२.४१ टीएमसी (उणे २१ टक्के) इतका राहिला आहे. तीव्र उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाल्यानेही पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. भविष्यात पाऊस लांबल्यास भीमा नदीत पाणी सोडण्याची वेळ आल्यास त्याचा निर्णय राज्य शासन घेईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या पाणीसाठा: ५२.४० टीएमसी
पाण्याची टक्केवारी उणे २१ टक्के
गतवर्षी याच दिवशी उणे २३ टक्के
नदी, कालवा विसर्ग: बंद
प्राधान्य : पिण्यासाठी राखीव
नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यापूर्वी कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी देण्यात आले. आता धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे, धरणातील पाणीसाठा उणे २१ टक्क्यांवर गेल्याने कालव्यातून पाणी सोडणे शक्य नाही. भविष्यात नदीत पाणी सोडण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास त्याबाबतचा निर्णय राज्य शासनामार्फत घेतला जाईल. –
एस. एस. खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर