Lokmanya Tilak National Award 2025 : पुणे : भाजप नेते आणि केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आज लोकमान्य टिळक यांची जयंती देखील आहे. यानिमित्ताने लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्काराचे 2025 चे पुरस्कार्थी जाहीर करण्यात आले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती घेतली आहे.
दरवर्षी (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यंदा देखील 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या 105 व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 10.30 वाजता टिळक स्मारक मंदिरात या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. या सोहळ्यात टिळक महाविद्यालयाच्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, टिळक महाविद्यालय ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे हेही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि टिळक स्मारक ट्रस्टचे आधारस्तंभ डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुरस्कारासाठी नितीन गडकरींची निवड का?
यंदाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिला जाणार आहे. याबाबत माहिती देताना दीपक टिळक यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, नितीन गडकरी यांची दूरदृष्टी आणि देशाच्या विकासातील भरीव योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते हे विकासाचे साधन आहे, हे ओळखून गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारले, असे डॉ. रोहित टिळक म्हणाले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (PPP) प्रारूपातून त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नमामी गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नांनी लोकचळवळीचे स्वरूप आले. लोकमान्य टिळकांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत नितीन गडकरी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी कार्यरत आहेत. विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार त्यांच्याकडून होत आहे. तसेच, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची विक्रमी वेळेत उभारणी हे त्यांच्या कार्याचे उत्तम उदाहरण आहे, ज्यात त्यांनी सार्वजनिक-खासगी भागीदारीचे प्रारूप यशस्वीपणे वापरले. देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार रस्त्यांना पर्याय नाही, ही गडकरींची भूमिका महत्त्वाची असल्याचेही डॉ. टिळक यांनी अधोरेखित केले.