पंढरपूर तहसील पुरवठा विभागाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा उघड; रेशनकार्डसाठी नागरिकांचे हेलपाटे सुरुच
पंढरपूर / नवनाथ खिलारे : शासनाने सार्वजनिक अन्न धान्य वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी अनेक आमूलाग्र बदल केले. यामध्ये काही प्रमाणात यश आले. पण रेशन कार्ड मिळवण्यासाठीच नागरिकांना अनेक हेलपाटे मारून तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ऑनलाईन अर्ज भरून चलन भरूनही भारतात राहणाऱ्या नागरिकांना डिजिटल रेशन कार्ड 12 अंकी क्रमांक मिळविण्यासाठी नागरिकांची मोठी पिळवणूक होत आहे. याबद्दल नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने तहसील पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ सुरू असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिक हे रेशन कार्डसाठी सीएससी सेंटर व महा-ई-सेवा केंद्र येथून ऑनलाईन अर्ज करत असतात. पण नागरिक ऑनलाईन अर्ज करूनही त्यांना दोन-तीन महिने रेशन कार्ड मिळण्यास लागत आहेत. विविध शासकीय, शैक्षणिक, कामांसाठी रेशन कार्डची गरज नागरिकांना असते. गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना रेशनधान्य मिळविण्यासाठी रेशनकार्डची गरज असते.
चलन भरूनही झिजवावे लागतात उंबरठे
महा-ई-सेवा केंद्र अथवा सीएससी सेंटरमधून रेशन कार्डसाठी अर्ज भरून चलन भरूनही वेळेवर रेशनकार्ड मिळत नसल्याने नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना, निराधार महिलांना रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत सीएससी सेंटर चालकांना विचारणा केली असता शासनाचे सर्व्हर बंद असल्याने रेशनकार्ड मिळण्यासाठी वेळ लागत असल्याचे सांगितले जात आहे.
वेळेवर कार्ड वितरित करण्याची मागणी
ऑनलाईन रेशन कार्डला मंजुरी देण्याचे काम तहसील कार्यालय पुरवठा विभागातून केले जाते. पण इथेही चिरीमिरीसाठी विलंब केला जात असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने सर्व सेवा केंद्रांवर अथवा महा-ई-सेवा केंद्रांवर येऊन नागरिक हे विचारणा करत आहेत. यामुळे काही वेळा वादाचे प्रसंग उद्भवत असल्याच्या घटना घडत आहेत. पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने वेळेवर रेशन कार्ड वितरित करण्याची मागणी रेशन कार्ड धारकातून केली जात आहे.
हेदेखील वाचा : Pimpri News : ‘लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का?’; आयुक्त शेखर सिंह यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलंचं झापलं