सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (दि.7) होत आहे. जवळपास सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसत आहे. असे असतानाच माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha) सत्ताधाऱ्यांकडून पैसे देऊन मतांची खरेदी केली जात असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाचे उमेदवार स्वरूप जानकर यांनी केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात मतांची खरेदी सुरू आहे. १००० आणि ५०० रूपयांना मत खरेदी केले जात आहे. सायंकाळपर्यत हा दर आणखी वाढेल. सोमवारी रात्री माण विधानसभेत नुसता धुमाकूळ सुरू होता. शक्य असल्यास आयोगाने याकडे गांभीर्याने पाहावे. @CEO_Maharashtra
— Swarup Jankar (@swarupdjankar) May 7, 2024
पैसे देऊन मतांची खरेदी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे ट्विटही जानकर यांनी केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘माढा लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात मतांची खरेदी सुरू आहे. १००० आणि ५०० रूपयांना मत खरेदी केले जात आहे. सायंकाळपर्यत हा दर आणखी वाढेल. सोमवारी रात्री माण विधानसभेत नुसता धुमाकूळ सुरू होता. शक्य असल्यास आयोगाने याकडे गांभीर्याने पाहावे’, असे त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले.
दरम्यान, माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. तर धैर्यशील मोहिते-पाटील हे महाविकास आघाडीकडून तसेच स्वरूप जानकर हे मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.