रविंद्र माने-वसई-विरार : सवर्च परवानग्या बोगस कागदपत्रांद्वारे तयार करणा-या सत्पाळा येथील मदर तेरेसा हे अनाधिकृत हॅास्पीटल आरोग्य विभागाने सील केले असून, पालिका आणि महसुल विभागाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे माजी सभापती जयप्रकाश ठाकुर यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्तर वसईतील सत्पाळा ग्रामपंचायत कार्यालयाला लागून असलेल्या मदर तेरेसा या हॅास्पीटलची इमारत जुन्या आणि जीर्ण इमारतीवर उभारण्यात आली असून, या धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती जयप्रकाश ठाकुर यांनी महापालिकेकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ठाकुर यांनी खोलात जाऊन या इमारतीची माहिती घेतली असता, या मदर तेरेसा हॅास्पीटलसाठी जॅाकीमा लोबो आणि व्हिक्टर लोबो यांनी बोगस कागदपत्रे तयार केली असल्याचे उघड झाले.
या हॅास्पीटलची उभारणी करताना, या लोबो दाम्पत्यांनी महसुल, आरोग्य, ग्रामपंचायत, पालिका, सह दुय्यम निबंधक, सिडको आणि नगररचना विभागाची फसवणूक केल्याची माहिती त्यांच्या हाती लागली. सत्पाळा ग्रामपंचायतीने इमारतीसाठी दिलेल्या नाहरकत दाखल्यातील अटी-शर्तींचा भंग करणे, सदर जागेवर जुनी इमारत असतानाही, ती मोकळी असल्याचे भासवून तिनदा बिनशेती करुन घेणे, जागेचे खरेदी खत करतानाही जागा मोकळी असल्याचे दाखवून सह दुय्यम निबंधकांची फसवणूक करणे, भुमी अभिलेख कार्यालयाचा बोगस नकाशा बनवणे, मुळ इमारत रहिवासी असणाऱ्यांच्या वापर करणे तिचा वाणीज्य वापरासाठी असा उल्लेख करणे, बोगस टायटल सर्च रिपोर्ट बनवणे, सिडकोचे बनावट प्रमाणपत्र जोडणे असे अनेक प्रकार मदर तेरेसा हॉस्पिटल उभारण्यासाठी करण्यात आल्याचे उघड झाले.
अशा अनेक तक्रारी आल्यानंतर सत्पाळा ग्रामपंचतीने सदर इमारतीला अनधिकृत घोषीत करुन हॅास्पीटलला कोणतीही परवानगी आणि दाखले न देण्याचा ठराव केला आहे. प्रथम तीन मजली इमारत उभारून आणि त्यानंतर त्यावर मजले चढवून, वाढीव बांधकाम करण्याचे हे धाडस लोबो दाम्पत्यांनी केले आहे. तसेच ही इमारत हॅास्पीटलच्या वापरासाठी अयोग्य असल्याचीही तक्रार जयप्रकाश ठाकुर यांनी जिल्हा आरोग्य अधिका-यांकडे केली होती. त्यानुसार चौकशी करुन या इमारतीला आरोग्य विभागाने २७ ऑगस्टला सील केले आहे. सदर हॉस्पीटल आणि इमारत अनधिकृत असून त्यात ओपीडी आणि आयपीडी करण्यात येऊ नये असा तालुका आरोग्य अधिका-यांच्या आदेशाचा फलकही मदर तेरेसा हॉस्पीटच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.
आरोग्य विभागाने मदर तेरेसा हॉस्पीटलसंदर्भात कठोर पाऊल उचलले असतानाच, आपली खोटे कागदपत्रे बनवण्यात आल्याचे कळल्यावरही महापालिका, सह दुय्यम निबंधक, भुमी अभिलेख, महसुल विभाग आणि नगररचना विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे मदर तेरेसा हॉस्पीटल इमारत अधिकृत करण्यासाठी लोबो यांनी नगररचना विभागाकडे अर्ज केला असून, त्या अर्जासोबत जोडलेली कागदपत्रेही बोगस असल्याचे पुरावे जयप्रकाश ठाकुर यांनी जोडले आहेत. तरिही पालिकेकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही.