
राजकीय घडामोडींनी वातावरण तापले, राजगुरुनगरमध्ये चौरंगी लढत; कोणाला कौल मिळणार?
नगराध्यक्षपदासाठी प्रमुख चेहरे
शिवाजी मांदळे – (भाजप) पूर्वी नगराध्यक्ष राहिल्याचा अनुभव, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय समन्वयाची बांधिलकी हे मांदळे यांचे बलस्थान.
मंगेश गुंडाळ – शिवसेना (शिंदे गट) अनुभवी माजी नगरसेवक. अतुल देशमुख यांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेची शहरातील उपस्थिती नव्याने मजबूत.
किरण आहेर – (राष्ट्रवादी अजित पवार गट)
काँग्रेसमधून राष्ट्रवादीत अचानक एंट्री. दिलीप मोहितेंच्या रणनीतीमुळे अचानक समीकरणे बदलली.
बापूसाहेब थिगळे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
माजी नगराध्यक्ष. राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने उबाठा शिवसेनेत प्रवेश. महाविकास आघाडीच्या छुप्या समर्थनाचा लाभ मिळण्याची शक्यता.
राजकीय पट ढवळून निघाला
शहर विकास आघाडी स्थापन करून आमदार बाबाजी काळे यांनी स्वतंत्र शक्तिप्रदर्शनाची तयारी केली होती. १६ उमेदवारांसह प्रवेश करण्याच्या तयारीत असताना माजी आमदार दिलीप मोहिते यांनी किरण आहेर यांना राष्ट्रवादीत दाखल करून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन मोठा राजकीय ट्विस्ट दिला. या हालचालीमुळे काळेंची मांडणी विस्कटली आणि शहरातील राजकारणात एकच खळबळ उडाली.
शिवसेनेचा (शिंदे गट) अचानक वाढलेला प्रभाव
शहरात शिवसेनेचा पूर्वीचा प्रभाव मर्यादित होता. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटातील अतुल देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश करताच समीकरणे बदलली. अनुभवी मंगेश गुंडाळ यांना दिलेली उमेदवारी आणि नव्या संघटनशक्तीमुळे शिंदे गटाने मोठा दमदार दावा सादर केला आहे.
महायुतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे
भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांपासून स्वतंत्रपणे लढत आहेत. पारंपरिक ‘सेटिंग’ किंवा ‘टायअप’ यावेळी जवळजवळ अशक्य असल्याने मतांचे तुकडे होणार हे स्पष्ट झाले आहे. ही विभागणी कोणत्या उमेदवाराला अंतिम फायद्यात आणते, हेच निवडणुकीचे मूळ ठरणार आहे.
राजगुरुनगर मतदारांचा कौल कोणाकडे झुकतोय ?
राजगुरुनगरमध्ये विविध सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय वर्गांचे वेगवेगळे कल पाहायला मिळत आहेत. बापूसाहेब थिगळे यांना महाविकास आघाडीच्या सहकार्याचा अप्रत्यक्ष लाभ. किरण आहेर यांना मोहिते गटाची ताकद. मंगेश गुंडाळ यांच्या मागे अतुल देशमुखांची संघटनशक्ती आणि शिंदे गटाचा जोर. शिवाजी मांदळे यांना भाजपची संघटना व पूर्वीच्या कारकिर्दीची ओळख. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून ‘कोण बाजी मारणार ?’ हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. राजगुरुनगरचा अंतिम निकाल हा केवळ पक्षांवर नाही तर स्थानिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि प्रभागनिहाय समीकरणांवर ठरणार आहे.