पुणे : अहमदनगर जिल्ह्याच्या नामकरण करण्याचा अंतिम निर्णय झाला नाही. नगर जिल्ह्याच्या नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, अशा शब्दांत महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्याच्या नामकरणापेक्षा विकासावर भर देण्याबाबत भाष्य केले.
भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी नामांतरापेक्षा विकासाला महत्व द्या, असे आवाहन नगरच्या नामांतराची मागणी करणाऱ्या सहकारी आमदारांना केले. नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करावं, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. तसेच, परभणी जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश भूमरे यांनी केली होती.
नगर जिल्ह्याच्या नामांतराचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पण, नगर जिल्ह्याच्या नामांतर करण्यापेक्षा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे सांगून खुद्द भाजपचे मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनीच नगरच्या नामांतरास विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्याच्या विभाजनाचीही चर्चा होते. पण, हे सांगून आपण काय साध्य करतो आहोत. आम्ही नगरचा विकासाचा आराखडा तयार केला आहे. पर्यटन, औद्योगिक असे अनेक विषय आहेत.
माझी अपेक्षा आहे की बाहेरच्या लोकांनी येऊन भाष्य करण्यापेक्षा तिथल्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. नगर जिल्ह्यातील विकासाबाबत एकत्र येऊन सर्वांनी मुद्दे मांडले पाहिजेत. आमदार गोपीचंद पडळकर हे माझे मित्र आहेत. नगर जिल्हा नामांतराबाबत मी त्यांच्याशी बोलतो, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.