Villagers are aggressive after permission was given to quarry and stone crusher in Kusgaon
वाई : जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना लेखी निवेदन देऊनही कुसगाव येथील दगड खाण व स्टोन क्रशरला परवानगी दिल्याने कुसगाव, एकसर, व्याहळी कॉलनी, पार्टेवाडी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन देत कुसगाव ते मुंबई पर्यंत लाँग मार्च काढण्यास आला.
आज (दि.17) रोजी सकाळी अकरा वाजता कुसगाव पासून या मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजता वाई तहसीलदार कार्यालयावर ग्रामस्थांनी जनावरांसह धडक मोर्चा काढला. दोन तास प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला, तरीही वाई प्रशासनाने कसलीही दाखल न घेतल्याने कुसगावकरांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला. सुरुरमध्ये आजचा मुक्काम करून शुक्रवारी सकाळी मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. महामार्गावर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
कायद्याला केराची टोपली दाखवत बेकायदेशीर पद्धतीने परवानगी कशी काय देण्यात येते तसेच मौजे कुसगाव ता. वाई ब्लॅक जेम स्टोन क्रशर बफर झोनमध्ये असलेले सर्व पुरावे शासन दरबारी सादर करण्यात आले. दगड खाण व क्रशर सुरू करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव नसतानाही क्रशरला बेकायदेशीर परवाना देण्यात आली. दगड खाण व क्रशर असणारे क्षेत्र वन क्षेत्राला लागून असतानाही त्याला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली असल्याचे सर्व पुरावे सादर करण्यात आले. यासारखे अनेक मुद्द्यांवरुन हा क्रशर व खाण बेकायदेशीर असल्याची सर्व माहिती पुराव्यानिशी जिल्हा प्रशासनासमोर सादर करूनही 2024 साली तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिलेला निकालाला कंटाळून आजपासून जिल्हा प्रशासनातील महसूल, गौण खनिज, जीवन प्राधिकरण, वन विभाग यातील अधिकारी यांच्या विरोधात कुसगाव ते मुंबई (मंत्रालय) लाँग मार्च काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणात बिकायदेशीर काम करणाऱ्या साताऱ्याचे 2024 साली असणारे तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, गौण खनिज अधिकारी अमोल थोरात, वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, वाईच्या निवासी तहसीलदार वैशाली जयगुडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी यांना निलंबित करणे. त्याचबरोबर संबंधित खाणीचा खाणपट्टा आदेश व क्रशर परवा रद्द करावा अन्यथा आमचे जबरदस्ती पुनर्वसन करून आम्हाला देशोधडीला लावावे. या आमच्या प्रमुख मागण्या असणार आहेत. आम्ही आमच्या घरातील लहान मुले, वृद्ध महिला, सर्व तरुण मंडळी यांच्यासोबत आमच्या गाई म्हशी, शेळी यांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झालो आहोत. तरीही वाई तहसीलदार आकाडी करण्यात मग्न असल्याने गरीब शेतकऱ्यांकडे पाहण्यास त्यांना वेळ नाही. वाई पोलीस प्रशासनाने त्यांना विनंती करूनही तहसीलदारांनी लाँग मार्चची कसलीही दाखल घेतली नाही, अशी व्यथा गावकऱ्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लाँग मार्च तहसील कार्यालयावर आल्यानंतर तेथून निघून जाणेच पसंद केले. त्यावेळी तहसील कार्यालयात कोणीही हजर नव्हते. त्यामुळे कुसगावकरांचा लाँग मार्च वाई शहरातून सुरूकडे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रवाना झाला. तरी जिल्हा प्रशासनाने लाँग मार्चची त्वरित दखल घेऊन क्रशरची परवानगी रद्द करून तसे पत्र देण्यात यावे असे ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यावर कुसगांव, एकसर, पार्टेवाडी, व्याहळी कॉलनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.
तसेच या लाँग मार्चमध्ये आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे आणि आमच्यासाठी अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात यावी. आमच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार असेल. असेही दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सकाळपासून लॉंग मार्च दहा किलोमीटर अंतरावर आलेला आहे अद्याप एकही महसूलचा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही. लॉंग मार्चमध्ये निवेदनातून मागणी करून ही ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तहसीलदार कार्यालयामध्ये एकही जबाबदार अधिकारी अधिकारी उपलब्ध नव्हते, अशी तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.