File Photo : BJP Flag
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार, भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेले विनोद तावडे यांना पुन्हा राज्यात पाठविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यातील फडणवीस आणि शिंदे गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीतून घेण्यात आला मोठा निर्णय; विस्तार आता…
मुंबईतील भूमिगत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे 24 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ट्विट करून दिली. तेव्हापासून ही चर्चा सुरु झाली आहे. मुंबईतील पहिली भुयारी रेल्वे लवकरच सुरु होत आहे. कुलाबा ते सिप्झ व्हाया बीकेसी अशा भूयारी मेट्रोचा पहिला टप्पा येत्या 24 जुलै रोजी सुरु होणार असल्याचे तावडे यांनी ट्विट केले. एक्स माध्यमावर विनोद तावडे यांनी एक पोस्ट शेअर केली त्यात ही बातमी मुंबईकरांसाठी दिली.
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत कापलं होतं तिकीट
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विनोद तावडे त्यांच्या मंत्रिमंडळात होते. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत तावडे यांना तिकीट नाकारले होते. त्यावेळी तावडे यांच्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. तावडे यांना देशपातळीवर पक्षसंघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अनेक राजकीय प्रयोग केले. पण विनोद तावडे हे पाच वर्षे राज्याबाहेरच होते.
महाराष्ट्रात भाजपकडून तावडे?
भाजपच्या केंद्रीय स्तरावरून विनोद तावडे यांच्यासारख्या बहुजन चेहरा राज्याच्या राजकारणात नेतृत्व म्हणून उतरवला जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना हा राज्यातील नेतृत्व बदलाचा संकेत आहे का? असा अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला जात आहे.