Washim Constituency, MLA Lakhan Malik cried profusely after being denied ticket by BJP
वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. अवघ्या एका महिन्यावर निवडणुकीचा रणसंग्राम आला असल्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुतीसह महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले असून उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले आहेत. भाजपने काल (दि.26) सायंकाळी दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने आतापर्यंत 121 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये काही उमेदवारांचा भ्रमनिरास झाला आहे. काही मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांना संधी नाकारली गेल्यामुळे नाराजी पसरली आहे..
वाशिम मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार लखन मलिक यांचे तिकीट भाजपने कापले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना संधी न दिल्यामुळे लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले. भाजपाने पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांना वाशीममधून संधी दिली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार लखन मलिक यांचा पत्ता कट झाला आहे. यंदा पहिल्यांदाच महायुतीमधील तीन पक्ष एकत्रित लढत आहेत. त्यामुळे भाजपमधील अनेक नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे.
हे देखील वाचा : उमेदवारांनो, खर्च करताना जरा जपूनच; नाहीतर पदच येईल धोक्यात
आमदार लखन मलिक यांचे तिकीट भाजप पक्षश्रेष्ठींनी कापल्यामुळे ते ढसाढसा रडले. अश्रू अनावर होऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “इमानदारीने पक्षाचं काम केलं. मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. पक्षाने माझ्यावर थोडातरी विश्वास ठेवायला पाहिजे होता”, असे म्हणत आमदार लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले होते.
पुढे आमदार लखन मलिक म्हणाले की, “वाशीम मतदारसंघामधून मी चारवेळा आमदार झालो. त्यामुळे मला माझ्या पक्षावर विश्वास होता की, मला पक्ष तिकीट देईल. मला आताच समजलं की दुसऱ्यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे मी आत्ता काही बोलणार नाही. पण सर्व कार्यकर्त्यांना बोलावून माझी भूमिका मी स्पष्ट करेन. मात्र, आमच्या नेत्यांनाच माहिती की मला उमेदवारी का दिली नाही? आम्ही इमानदारीने पक्षाचं काम केलं. त्यामुळे आम्हाला विश्वास होता की आम्हाला तिकीट मिळेल. पण आता माझ्यावर अन्याय झाला आहे. कारण मला संधी द्यायला हवी होती. मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. पक्षाला बदनाम केलेलं नाही. कोणालाही फसवलं नाही. त्यामुळे विश्वास ठेवायला पाहिजे होता,” असे आमदार लखन मलिक म्हणाले आहेत.