
BJP Alliance MIM And Congress:
BJP Alliance MIM And Congress: अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत भाजपने सत्तेसाठी एमआयएमशी युती केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. भाजपने आपल्या सर्व तत्त्वांना मुरड घातली का, असा प्रश्नही उपस्थित केले जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसशी आघाडी केल्यानंतर, अकोल्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने थेट एमआयएमसोबत आघाडी केली.
अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असल्या, तरी भाजपला बहुमत मिळवता आलेले नाही. बहुमताअभावी सत्तास्थापनेसाठी भाजपने आपल्या नेतृत्वाखाली ‘अकोट विकास मंच’ची स्थापना केली आहे. या मंचात भाजपनंतर सर्वाधिक म्हणजे पाच जागा जिंकणारा एमआयएम पक्ष सहभागी झाला असून, त्यामुळे भाजप–एमआयएम युतीचे नवे समीकरण पुढे आले आहे. या आघाडीत ठाकरे गटाची शिवसेना, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष यांचाही समावेश आहे. या नव्या आघाडीची अधिकृत नोंदणी मंगळवारी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
दुसरीकडे, अंबरनाथ नगरपरिषदेतदेखील भाजप आणि काँग्रेसने युती केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसशीही हातमिळवणी केली. एकीकडे काँग्रेसचा पारंपरिक विरोधक असलेल्या भाजपकडून सातत्याने काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा दिल्या जातात. पण भाजपनेच काँग्रेसशी युती केल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर झालेल्या एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या युतीवर संताप व्यक्त केला आहे. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युतीवर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. स्थानिक पातळीवर जे काही झालं ते चुकीचचं आहे. ज्याने कोणी हे केलं असेल, त्याचावर कारवाई करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी भाजपने चक्क एमआयएमशी युती केली. भाजपने बहुमतासाठी अकोट विकास मंच स्थापन केला. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर यांना गटनेतेपद देण्यात आले. तसेच या आघाडीतील सर्व पक्षांना भाजपचा व्हिप पाळावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. १३ जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्र मतदान करणार आहे. ३५ सदस्यांच्या नगरपरिषदेत भाजपला ११ तर एमआयएमला ५ जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या माया धुळे नगराध्यक्ष झाल्या असल्या तरी बहुमत नसल्याने भाजपने एमआयएमशी हातमिळवणी केली आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी ही हातमिळवणी करण्यात आली. भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. नगरपरिषदेत भाजपकडे बहुमत नसल्याने भाजप (१६), काँग्रेस (१२) आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी (४) अशा ३२ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्यात आली. दरम्यान, शिंदे गटाने या युतीवर तीव्र टीका करत याला ‘अभद्र युती’ असल्याचं म्हटलं आहे.