
फोटो सौजन्य - Social Media
विदर्भ साहित्य संघ व स्व. सीमा शेटे स्मृतीस समर्पित अकोला येथे आयोजित ‘कवी कट्टा’ लेखिका संमेलन या विशेष साहित्यिक उपक्रमासाठी कामरगाव येथील पीएमश्री जिल्हा परिषद विद्यालयातील १२ विद्यार्थिनींची निवड होणे ही शाळेसह परिसरासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थिनी शाळेतील तरुण संपादक मंडळाच्या सक्रिय सदस्य असून, साहित्यिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेत आहेत.
अकोला येथील प्रा. भाऊसाहेब मांडवगणे साहित्य नगरी येथे गुरुवारी (दि. २५) झालेल्या लेखिका संमेलनात या विद्यार्थिनींनी आपले काव्यवाचन सादर केले. शालेय वयातच साहित्यिक अभिव्यक्तीला चालना देणारा ‘कवी कट्टा’ हा उपक्रम नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा मानला जातो. या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या साहित्यिक प्रतिभेला नवी दिशा मिळाली आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. सुरेश राठोड, पर्यवेक्षक गोपाल खाडे आणि पर्यवेक्षक प्रा. विकास रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. शाळेमध्ये नियमितपणे राबविण्यात येणारे वाचन, लेखन व संपादनविषयक उपक्रम यामुळे विद्यार्थिनींमधील काव्यप्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या कविता व कथांचे हस्तलिखित संकलन शाळेमार्फत तयार करण्यात आले असून, यामुळे लेखनातील शिस्त व सातत्य जोपासले जात आहे.
तरुण संपादक मंडळाच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम शाळेत राबविले जात असल्याने विद्यार्थिनींची सर्जनशीलता बहरास आली आहे. केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारमांडणी आणि भाषिक आत्मविश्वास विकसित करण्यावर शाळेचा भर असल्याचे या उपक्रमातून दिसून येते.
‘कवी कट्टा’साठी निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये आरुषी भुजाडे, जानवी देशमुख, श्रावणी ठाकरे, तनुजा पांडे, आचल लाड, सिद्धी जुननकार, धनश्री चौके, परी घोडे, पायल माहूरकर, कृष्णाई गाढवे आणि खुशी ठाकरे यांचा समावेश आहे. या निवडीमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साह संचारला असून, पुढील साहित्यिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली आहे.
या यशाबद्दल निवड झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे तसेच तरुण संपादक मंडळाचे मार्गदर्शक शिक्षक गोपाल खाडे, नीता तोडकर, दिपाली खोडके, दिलीप आंबेकर, प्रा. विकास रुईकर, सतीश चव्हाण आणि कैलास वानखडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शालेय पातळीवरून साहित्यिक व्यासपीठांपर्यंत पोहोचणाऱ्या या विद्यार्थिनी इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत.