हिंगोली नगर पंचायतीमध्ये रेखा श्रीराम बांगर यांनी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला (फोटो - सोशल मीडिया)
Hingoli Politics : हिंगोली : हिंगोली नगर परिषदेत तब्बल तीस वर्षानंतर शिवसेनेला नगराध्यक्षपद मिळाले असून, थेट जनतेतून निवडून आलेल्या नूतन नगराध्यक्ष रेखा श्रीराम बांगर यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. या निवडीमुळे शहराच्या राजकारणात नवे समीकरण उदयास आले आहे.
सन १९९७ मध्ये शिवसेनेकडून बबनराव शिखरे हे नगराध्यक्ष होते. त्यानंतर दीर्घकाळ नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आले नव्हते. शिवसेना-भाजप युतीच्या काळात हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार असल्याने नगराध्यक्षपद भाजपकडे राहण्याचा अलिखित करार होता. याच कालावधीत सन २००१ ते २००६ दरम्यान काँग्रेसचे सुधीरप्पा सराफ हे नगराध्यक्ष झाले होते, तर मागील थेट निवडणुकीत भाजपकडून बाबुराव बांगर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने स्वबळावर निवडणूक लढवली.
हे देखील वाचा: रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री
या निवडणुकीत रेखा बांगर यांनी तब्बल ११४३८ मताधिक्याने विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपली मोहोर उमटवली. आज झालेल्या पदभार स्वीकार सोहळ्यावेळी आमदार संतोष बांगर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नगरसेवक श्रीराम बांगर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष व नगरसेवक फेटे बांधून सभागृहात दाखल झाल्याने वातावरणात उत्साहाचे चित्र दिसून आले.
शहराच्या सर्वांगीण विकासावर भर
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नूतन नगराध्यक्ष रेखा श्रीराम बांगर म्हणाल्या की, हिंगोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांच्या मूलभूत समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व नागरी सुविधा यांना प्राधान्य दिले जाईल.
नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील प्रश्न गांभीर्याने मांडावेत व ते मार्गी लावण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष व नगरसेवक फेटे बांधून सभागृहात दाखल झाल्याने वातावरणात उत्साहाचे चित्र दिसून आले.
नांदेडमध्ये शिवसेनेची दुहेरी खेळी ?
नांदेड महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच शहरातील राजकीय हालचाली वेगाने बदलू लागल्या आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युतीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असल्याचे चित्र असतानाच, शिवसेनेच्या एका प्रभावी गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर स्वतंत्र आघाडी स्थापनेसाठी बोलणी अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नांदेडच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : मातोश्रीवर घडामोडींना वेग! मुंबईसाठी जयंत पाटलांचे ठाकरेंना गाऱ्हाणे?
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप-शिवसेना युतीसंदर्भात जिल्हा पातळीवर दोन बैठका पार पडल्या असून त्यात प्राथमिक सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चर्चादरम्यानच शिवसेनेतील एका आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी तसेच शहराध्यक्षांशी स्वतंत्र संपर्क ठेवत राजकीय खलबते सुरू ठेवली आहेत. या दुहेरी हालचालींमुळे भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला असून शिवसेनेच्या युतीविषयक भूमिकेबाबत साशंकता वाढली आहे. मुंबईत वरिष्ठ पातळीवर युतीची चर्चा सुरू असल्याचे शिवसेनेकडून जाहीरपणे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात स्थानिक स्तरावर वेगळीच राजकीय गणिते आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आ. हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांची भेट घेत संभाव्य युती बाबत चर्चा केल्याचे वृत्त आह. यामुळे शिवसेनेतील एका गटाची दिशा आणि उद्दिष्टे स्पष्टपणे समोर आल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
–






