
Gadchiroli News: ऐनहिवाळ्यात गावांचा नळ कोरडा, मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प
नागरिकांच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर २०१९-२० मध्ये चामोर्शी तालुक्यातील घोट येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत ‘हर घर जल’ ही योजना राज्य व केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात आली. या योजनेंत समाविष्ट असलेल्या घोट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पाचही गावांतील नागरिक व जवाहर नवोदय विद्यालय यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून १ मे २०२५ ला काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, जेमतेम १ महिनाही लोटत नाही, तोच मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद पडला आहे.
परिणामी ऐन हिवाळ्यात ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. घोट ग्रामपंचायतीअंतर्गत घोट, कर्दूळ आदींसह ५ गावांचा समावेश आहे. याच हद्दीत येत असलेल्या जिल्ह्यातील एकमेव केंद्र शासनाचे जवाहर नवोदय विद्यालय आहे. पाच गावांसह नवोदय विद्यालयाला पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा होत आला आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे १ जून २०२५ पासून पाणीपुरवठा बंद पडला आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे घोट परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी एक ते दीड किमीची पायपीट करावी लागत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
काही नागरिक आरओचे पाणी विकत घेत आहेत. या प्रकारामुळे १८ कोटींची ही योजना पाण्यात गेल्याचे चित्र आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ ही योजना अल्पावधीत बंद पडल्याबाबत निवेदन देऊन योजना सुरळीत राबविण्याकरिता संबंधित मुख्य अभियंत्यांना निवेदनसुद्धा दिलेले आहे. मात्र याकडे कायम दुर्लक्ष होताना दिसत आहे. शासनाकडून नागरिकांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. मात्र, यात कंत्राटदार नफा कमावतो व जनता मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करीत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. बंद असलेली पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
कर्दूळ गावातील नागरिक १ किमी अंतरावरील स्मशानभूमीवर असलेल्या हातपंपावरून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. हे ग्रामपंचायतचे दुर्दैवच आहे. साधारण कुटुंबातील नागरिक पिण्याचे पाणी विकत घेऊ शकत नाही. कर्दूळ येथील नागरिकांना पायदळ व दुचाकीने पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याची व्यथा नीतेश मोहुर्ले, नूतन लोहबळे, मनोज सातपुते, पत्रू मोहुर्ले, इंदू मोहुर्ले, संगीता सातपुते यांनी व्यक्त केली.