IAS Tukaram Mundhe : 20 वर्षात तब्बल 24 वेळा बदली; आता तर थेट राजीनाम्याची मागणी, 'हे' कारण ठरतंय चर्चेचं
पुणे : अत्यंत शिस्तप्रिय, कामामध्ये असलेला वक्तशीरपणा अशी ओळख असलेले अधिकारी म्हणून आयएएस तुकाराम मुंढे हे परिचित आहेत. तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे अधिकारी असून, गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत त्यांची 24 वेळा बदली झाली. बदली होणे हेदेखील त्यांच्यासाठी जणू नित्याचेच झाले आहे. असे जरी असले तरी आता मात्र थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी आमदाराकडून करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांच्याकडे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद होते. या पदावर काम करताना त्यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले असल्याचा आरोप केला जात आहे. काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचेही सांगण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या दबावात तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आवश्यक कारवाई होऊ शकली नव्हती. आता ते दोन्ही जुने प्रकरण नव्याने पुन्हा समोर आणून भाजप आमदार तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे.
हेदेखील वाचा : Winter Session: सुरक्षेचे नियम धाब्यावर, मंत्री-आमदारांनाच शिस्तीची गरज; पोलिसांच्या गोपनीय अहवालात नेमकं काय?
तुकाराम मुंढे यांनी १९९६ मध्ये इतिहासात बी. ए. केले. त्यानंतर ते मुंबईला गेले आणि त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, त्यांनी हार मानली नाही. अखेर २००५ मध्ये त्यांच्या मेहनतीला यश मिळाले. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आणि २००५ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी झाले.
सोलापुरात पहिली पोस्टिंग तेही उपजिल्हाधिकारी म्हणून
सोलापूरमध्ये त्यांची पहिली पोस्टिंग उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. तिथे त्यांनी बेकायदेशीर दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकले आणि खळबळ उडवून दिली. त्यांच्या २० वर्षांच्या आयएएस सेवेत त्यांची २४ वेळा बदली झाली. त्यांच्या या कडक शिस्ती आणि प्रामाणिकपणामुळे ते राजकारणी आणि माफियांचे लक्ष्य राहिले आहे. मात्र, त्यांनी आपल्या कामात कुठेही तडजोड केली नाही. त्यांनी जानेवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा कार्यभार स्वीकारला. मात्र, ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांची पुन्हा बदली झाली.
शेतकरी कुटुंब, पण जिद्दीने केलं सर्व साध्य
IAS अधिकरी तुकाराम मुंढे यांचा जन्म ३ जून १९७५ रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्याश्या गावात झाला. ते ओबीसी वर्गात येणाऱ्या वंजारी समाजाचे आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे बालपण गरिबीत गेले. शाळेतून परतल्यानंतर ते वडिलांना शेतात मदत करायचे. ते शेतात भाजीपाला पिकवायचे आणि बाजारात विकायचे. मात्र, दहावीनंतर त्यांचे जीवन बदलले. दहावीनंतर ते नातेवाईकांसोबत राहण्यासाठी आणि तिथेच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला गेले.






