
ऐन उन्हाळ्यात कलिंगडाचे बाजारभाव कोसळले; शेतकरी हवालदिल
चाकण : उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडाला मोठी मागणी राहील, अशी अपेक्षा असताना यंदा बाजारात उलट चित्र पाहायला मिळत आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी २२ ते २५ रुपये प्रति किलो दराने विक्री होणारे कलिंगड सध्या केवळ ५ ते १० रुपये प्रति किलो दराने विकले जात असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा अनुकूल हवामानामुळे कलिंगडाचे उत्पादन भरघोस झाले आहे. मात्र, अपेक्षित मागणी न झाल्याने बाजारात पुरवठा वाढला आणि दर घसरले. स्थानिक बाजारपेठांसह कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक होत असल्याने दरावर आणखी दबाव निर्माण झाला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कलिंगडाच्या शेतीत ‘सुपर शुगर’, ‘अरका ज्योती’, ‘किरण’, ‘शुगर बेबी’, ‘ऑगस्टा सिम्बा’ अशा विविध जातींचा समावेश असून, त्यांच्या गोडी, आकार आणि साठवण क्षमतेनुसार बाजारभाव ठरतो. मात्र, यंदा सर्वच जातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने दर घसरले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील कलिंगड गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब, बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवले जाते. यंदा वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि इतर राज्यांतील स्थानिक उत्पादन वाढल्यामुळे परप्रांतीय मागणीत घट झाली आहे. त्यामुळे बाहेरील बाजारपेठांमधील विक्रीवर परिणाम झाला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांचा देखील परिणाम कृषी बाजारावर जाणवत आहे. निर्यात प्रक्रिया विस्कळीत झाल्याने फळांची निर्यात मर्यादित झाली असून, स्थानिक बाजारातच माल अडकून पडत आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणींत भर
वाढलेले इंधन दर आणि वाहतूक खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे तरकारी आडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचाही कलिंगडाच्या विक्रीवर परिणाम झाला असून, मालाची गुणवत्ता आणि मागणी दोन्हीवर त्याचा परिणाम दिसून आला आहे.
गुंतवणूकही परत मिळेना
कलिंगड लागवडीसाठी बियाणे, खत, मजुरी आणि पाण्यावर मोठा खर्च होत असताना सध्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना गुंतवणूक परत मिळत नाही. अनेक ठिकाणी शेतकरी माल बाजारात न नेता शेतातच सोडून देत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हमीभाव जाहीर करावा, वाहतूक अनुदान द्यावे तसेच निर्यात सुलभ करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.