
weather cooled down in Baramati rush to buy woolen clothes in market Maharashtra cold wave
थंडी वाढल्याने अनेकांनी टोपी, मफलर, हातमोजे आणि स्वेटरची तयारी सुरू केली आहे. काही दुकानदारांनी हिवाळी कपड्यांवर आकर्षक सवलती जाहीर केल्याने बाजारातही खरेदीला उत्साह दिसत आहे. थंड वातावरणामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष न करता गरम पेये, सूप, हळदीचे दूध आणि घरगुती काढा यांची मागणी झपाट्याने वाढली आहे. या पावसाळ्यामध्ये तब्बल पाच महिने मुसळधार पाऊस बारामतीकरांसह अन्य तालुक्यातील नागरिकांनी अनुभवला. त्यामुळे या हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : हा भारताच्या पुनर्जन्माचा मंत्र; वंदे मातरमवर राज्यसभेमध्ये अमित शाहांचा आक्रमक पवित्रा
गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी सुरू झाली आहे, मात्र मागील आठवड्यामध्ये रात्रीच्या वेळी काही प्रमाणात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती. मात्र दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे. सध्या रब्बी हंगामासाठी विशेषतः गहू पिकासाठी कडाक्याची थंडी फायद्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वाढती थंडी दिलासादायक आहे.
हे देखील वाचा : शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवायला निधी नाही, पण महामार्गासाठी १ लाख कोटी? राजू शेट्टींचा गंभीर आरोप
दरम्यान, थंडीमुळे व्यायामासाठी आणि सकाळी फिरण्यासाठी नागरिकांचा उत्साह मात्र दुपटीने वाढला आहे. शहरातील टीसी कॉलेज मैदान, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल, भिगवन रोड, इंदापूर बायपास रोड, माळेगाव रोड, नीरा कॅनल रोड यासह शहरातील गार्डनमध्ये सकाळपासूनच तरुणांसह वयोवृद्धांची गर्दी सुरू असते. धावणे, व्यायाम, योग आणि सायकलिंग करणाऱ्यांची संख्या इतर महिन्यांच्या तुलनेत अधिक दिसून येत आहे. अनेक फिटनेस तज्ञांनी थंडीत व्यायाम केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि मानसिक तणाव कमी होतो, असे सांगितले आहे. त्यामुळे शहरातील विविध व्यायाम शाळांमध्ये तरुण-तरुणींसह नागरिकांची व्यायामासाठी गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागात सायंकाळच्या आणि सकाळच्या वेळी शेकोट्या ठिकठिकाणी पेटल्याचे दिसून येत आहे.