
वातावरणात होतोय कमालीचा बदल; तापमानाचा पारा पुन्हा चढणार
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात तापमानात मोठी विषमता पाहायला मिळत आहे. अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरात किमान तापमानात तब्बल सहा ते सात अंश सेल्सिअसचा फरक नोंदविण्यात आला असून, एकाच शहरात कुठे कडाक्याची थंडी तर कुठे उकाडा अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर परिसरात सोमवारी किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तसेच हवेली तालुक्यात हे तापमान १०.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. याउलट, अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मगरपट्टा परिसरात किमान तापमान १६.९ अंश सेल्सिअस, लोहगाव येथे १६.२, तर कोरेगाव पार्कमध्ये १४.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
याबाबत माहिती देताना भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे येथील वैज्ञानिक ‘डी’ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, शिवाजीनगर येथील हवामान वेधशाळा कृषी महाविद्यालयाच्या परिसरात असून, येथे मोकळी जागा व हिरवाईचे प्रमाण अधिक आहे. बांधकाम कमी असल्यामुळे रात्री मोकळ्या जमिनीतून उष्णता वेगाने आकाशात निघून जाते आणि पहाटे किमान तापमान मोठ्या प्रमाणात घटते. त्यामुळे या भागात कडाक्याची थंडी जाणवते.
दुसरीकडे, मगरपट्टा, लोहगाव, कोरेगाव पार्क, लवळे यांसारखे परिसर आयटी हब आणि दाट लोकवस्तीचे आहेत. येथे काँक्रीटच्या इमारती, डांबरी रस्ते आणि काचांच्या इमारती मोठ्या प्रमाणात असल्याने त्या दिवसभर सूर्याची उष्णता शोषून घेतात व रात्री ती हळूहळू बाहेर सोडतात. परिणामी, रात्री आणि पहाटे या भागांमध्ये तापमान तुलनेने अधिक राहते. तसेच उंच इमारतींमुळे वाऱ्याचा प्रवाह अडवल्या जातो आणि उष्ण हवा तिथेच साठून राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि परिसरात किमान तापमान 14.8 अंशांवर
गेल्या काही दिवसांत शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली होती. मात्र, मंगळवारी (ता. १३) तापमानात मोठी वाढ झाल्याने शहरात संमिश्र हवामान अनुभवायला मिळाले. सकाळी गारठा, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी दमट हवामानामुळे पुणेकरांनी अक्षरशः ऊन-सावलीचा खेळ अनुभवला. मंगळवारी पुणे आणि परिसरात किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
तापमानात घट होऊन 14 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
पुढील दोन दिवसांत किमान तापमानात किंचित घट होऊन ते सुमारे 14 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, शुक्रवारपासून (ता.16) पुन्हा किमान तापमान वाढून १५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. या काळात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : ‘लालपरी’तून प्रवास आता होणार सुकर; एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश