
Weather Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; अनेक भागांत यलो अलर्ट
त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांत पावसाची पुन्हा हजेरी लागण्याची शक्यता आहे. एल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिले. परिणामी काही भागांत पिकांवर परिणाम झाला. आता सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबई परिसरात पनवेल, पालघर आणि ठाणे येथे आज कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. या भागात पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र, या भागात सर्वत्र पावसाचा जोर राहणार नसून तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील १० जिल्ह्यांना यलो अलर्ट
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी जोरदार सरींचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे, तसेच मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.