नागपूर – सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच नागपुरात होत असल्यामुळं या अधिवेशनाला अनन्यसाधरण महत्व प्राप्त झालं आहे. उद्या अधिवेशनाचे सूप वाजणार आहे, मात्र हे अधिवेशन अनेक वादग्रस्त मुद्यांवरुन गाजले तसेच घोटाळेबाज मंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन सुद्धा चर्चेत आहे. दरम्यान, या अधिवेशनकाळात ठळक प्रकर्षाने एक गोष्ट समोर आली ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघ मुख्यालयात तसेच आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या संघाच्या रेशीम बाग येथील स्मृति मंदिरात दर्शानासाठी गेले होते. यावर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे.
[read_also content=”ठाकरे गटाला शिंदे गट आणखी हादरे देणार? मुंबईत शिंदे गट राजकीय भूकंप करणार; आमदार भरत गोगावलेंचा इशारा, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-group-will-give-more-shocks-to-thackeray-group-shinde-group-will-cause-a-political-earthquake-in-mumbai-bharat-gogavle-warning-357751.html”]
एकनाथ शिंदे शिवसैनिक की जुने स्वंयसेवक?
दरम्यान, शिवसेना आमच्याबरोबर मागील २५ वर्षापासून आहे, पण संघ मुख्यालयात कोणी आलं नव्हतं, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यादा आलेत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जुने स्वंयसेवक आहेत. असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याचा अनेक अंगानी राजकीय तज्ज्ञ अर्थ काढताहेत. 1985 च्या दरम्यान, सुरुवातीला एकनाथ शिंदे ठाण्यातील किसननगर येथील संघ्याच्या शाखेत जात असत. मात्र नंतर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रभावाने ते शिवसेनेच्या शाखेशी निगडित राहिले. त्यावेळी ठाण्यात एक धर्मांतराची घटना घडली आणि यातून एकनाथ शिंदे यांच्यातील कट्टर हिंदू जागृत झाला. यावेळी एकनाथ शिंदे व शिवसैनिक रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध केला होता. त्यामुळं ते जरी आता शिवसैनिक असले तरी सुरुवातीला संघाशी संबंधित होते, म्हणून त्यांना जुने स्वंयसेवक बोललं जात आहे. तसेच एकनाथ शिंदे हे जुने स्वंयसेवक असल्याचा उल्लेख मंत्री गिरिष महाजनांनी केल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघाला शरण गेलेत का? अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
शिंदेंना हायजॅक केलं जातंय का?
भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करुन वेगळी खेळी खेळली आहे, यातून शिंदेंना हायजॅक करण्याची रणनीती भाजपाकडून होत असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी, सर्व यंत्रणा भाजपा चालवत आहे, सरकारमध्ये देखील शिंदे पेक्षा फडणवीसांची ताकद अधिक आहे. केंद्रात मोदी-शहाचे फडणवीस जवळचे मानले जातात. त्यामुळं निर्णय प्रक्रियेत फडणवीसांचे मत महत्वाचे ठरत आहे. यामुळं शिंदे हे बॅकफूटवर जात असून, शिंदेंना भाजपा हायजॅक करत असल्याचं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे भूखंड प्रकरण भाजपाच्याच काही आमदारांनी बाहेर काढलं, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे, यातून शिंदेंचे खच्चीकरण करुन त्यांचे राजकीय महत्त्व कमी करणे, आणि मुख्यमंत्रीपदी फडणवीसांची वर्णी लावणे. ही रणनिती भाजपाची असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांना भाजपा हायजॅक करत असून, ते भाजपाला हळूहळू शरण येताहेत. असं बोललं जातंय. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या संघ मुख्यालया भेटीतून अनेक अर्थ आणि त्या अर्थाचे अन्वयार्थ काढले जाताहेत.