
आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
वाई / सचिन ननावरे : गणेशोत्सवाच्या तोंडावर वाई औद्योगिक वसाहतीतील प्रसिद्ध ‘बावळेकर गौरी-गणपती मूर्ती कारखान्या’ला लागलेल्या भीषण आगीने एका कुटुंबाची आयुष्यभराची कमाई आणि उभारलेले वैभव डोळ्यांसमोर राखेत बदलले. मंगळवारी (दि.1) रात्री उशिरा भडकलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाई नगरपालिकेसह गरवारे वॉलरॉक्स, पाचगणी, महाबळेश्वर, फलटण, सातारा पालिका आणि किसन वीर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब धावून आले. जवळपास चार तास सुरू राहिलेल्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली; मात्र, या घटनेने वाई एमआयडीसीमध्ये स्वतंत्र आणि सुसज्ज फायर स्टेशनची नितांत गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
मंगळवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अचानक आग भडकली. कारखान्यात पेंटिंगसाठी वापरले जाणारे रंगाचे डबे, थिनर आणि इतर ज्वलनशील रसायने मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. मध्यरात्रीच्या काळोखात उंच भडकणाऱ्या ज्वाळा आणि परिसरात पसरलेल्या धुरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठा संघर्ष करावा लागला.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कारखान्यात गणेशमूर्ती, गौरी तसेच विविध साच्यांचे रंगकाम आणि अंतिम तयारी वेगाने सुरू होती. मात्र, आगीने अनेक तयार मूर्ती, गौरी-गणपतीच्या मूर्ती, साचे, रंगकामाचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणावरील कच्चा माल भस्मसात केला. प्राथमिक अंदाजानुसार, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेमुळे बावळेकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
डोळ्यांसमोर जळत राहिली आयुष्यभराची पुंजी
आयुष्यभर कष्ट करून उभारलेला व्यवसाय आणि वर्षानुवर्षे जमवलेली पुंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना पाहून बावळेकर कुटुंबाच्या दुःखाचा बांध फुटला. जळत्या कारखान्यासमोर कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र आर्थिक नुकसानीचे प्रमाण प्रचंड आहे.
घटनेची माहिती मिळताच वाईचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत अग्निशमन दलाच्या मदतकार्यात अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेतली.
एमआयडीसीत फायर स्टेशन नसल्याने बाहेरून मागवावी मदत
या दुर्घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे वाई एमआयडीसीमध्ये स्वतंत्र फायर स्टेशन नसल्याने आग विझवण्यासाठी अनेक ठिकाणांहून अग्निशामक बंब मागवावे लागले. वाई नगरपालिकेच्या बंबासह गरवारे वॉलरॉक्स, पाचगणी, महाबळेश्वर, फलटण, सातारा आणि किसन वीर साखर कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेला घटनास्थळी धाव घ्यावी लागली. ज्या औद्योगिक वसाहतीत विविध उद्योग कार्यरत आहेत, जिथे रसायने, रंग, थिनर आणि इतर ज्वलनशील पदार्थांचा वापर होतो, त्या वाई एमआयडीसीसाठी आग लागल्यानंतर बाहेरून मदतीची वाट पाहावी लागणे ही गंभीर बाब असल्याची चर्चा या घटनेनंतर सुरू झाली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाकडे औद्योगिक क्षेत्रांतील फायर स्टेशन्सचे संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी आहे. धोकादायक रसायने, ज्वलनशील आणि अतिज्वलनशील पदार्थांची हाताळणी व साठवणूक असलेल्या औद्योगिक क्षेत्रांत फायर सेवा उपलब्ध करण्याचे एमआयडीसीचे धोरण आहे. राज्यात एमआयडीसीची ३२ फायर स्टेशन्स कार्यरत असून आणखी १४ नवीन फायर स्टेशन्स मंजूर करण्यात आली आहेत.
राज्यातील अग्निसुरक्षा कायदे आणि औद्योगिक इमारतींसाठी असलेल्या नियमांनुसारही औद्योगिक वापराच्या ठिकाणी आगप्रतिबंधक आणि जीवितसुरक्षा उपायांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
प्रश्न आता केवळ भरपाईचा नाही, तर भविष्यातील सुरक्षेचा
बावळेकर कुटुंबाला झालेल्या नुकसानीची भरपाई करणे आणि या आगीचे नेमके कारण शोधणे आवश्यक आहेच; मात्र त्यापलीकडे जाऊन वाई एमआयडीसीच्या भविष्यातील अग्निसुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. स्वतंत्र फायर स्टेशन, कायमस्वरूपी प्रशिक्षित अग्निशमन दल, सुसज्ज फायर टेंडर, रासायनिक आगीसाठी आवश्यक उपकरणे आणि २४ तास आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा ही आता वाई एमआयडीसीची गरज नसून आवश्यकता बनली आहे.
मंगळवारी रात्रीच्या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र प्रत्येक वेळी नशिबाची साथ मिळेलच याची खात्री देता येत नाही. भविष्यात एखाद्या मोठ्या रासायनिक किंवा औद्योगिक दुर्घटनेत आगीचे लोळ शेजारच्या युनिटपर्यंत पोहोचले, तर परिस्थिती अधिक भीषण होऊ शकते.
बावळेकर कारखान्याच्या आगीने फक्त एक उद्योग उद्ध्वस्त केलेला नाही, तर वाई एमआयडीसीच्या अग्निसुरक्षेतील महत्त्वाची उणीवही जळत्या ज्वाळांमधून समोर आणली आहे. आता या इशाऱ्याची गंभीर दखल घेऊन स्वतंत्र फायर स्टेशन उभारण्यासाठी एमआयडीसी आणि शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी उद्योजक, कामगार आणि नागरिकांकडून होत आहे.
‘पहिल्या काही मिनिटांतच ठरते नुकसानीची तीव्रता’
औद्योगिक क्षेत्रातील आगीमध्ये सुरुवातीचे काही मिनिटे अत्यंत महत्त्वाचे असतात. स्थानिक पातळीवर तातडीने सुसज्ज अग्निशमन यंत्रणा उपलब्ध झाल्यास आग मर्यादित ठेवून मनुष्यहानी आणि मालमत्तेचे नुकसान कमी करणे शक्य होते. वाई एमआयडीसीसारख्या वाढत्या औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र फायर स्टेशन उभारणे ही केवळ सोयीची बाब नसून भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय असल्याचे मत व्यक्त होत आहे.