सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या उपक्रमातील छपाईच्या निविदेची जबाबदारी विभाग प्रमुखांची असताना आरसीएच समन्वयक फाइली फिरवीत असल्याचे दिसून आल्याने संशय वाढला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील विविध उपक्रमाच्या छपाईचे टेंडर लातूरच्या ममता जाहिरात एजन्सीला मंजूर केले आहे. या ऑनलाइन निविदामध्ये १७ संस्थांनी भाग घेतल्याचा दावा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक वैशाली थोरात यांनी केला आहे. समितीने नियमाप्रमाणेच ही निविदा मंजूर केले असे त्यांचे म्हणणे आहे. ज्यावेळी या निविदेबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली त्यावेळी आव्हाळे यांनी या फाइलीची तपासणी केली. छोट्या कामासाठी आता तुम्ही लातूरला जाणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर प्रकरण अंगलट येत आहे, असे पाहून या प्रकरणाशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. या कर्मचाऱ्यांनी मुख्य लेखा व्यवस्थापकाचा अभिप्राय घेऊन एकदा मंजूर झालेली निविदा रद्द करणे महागात पडेल, अशी भीती सीईओंना घातल्याची जिल्हा परिषदेत चर्चा रंगली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भंबेरी
सीईओनी या निविदेबाबत विचारणा केल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांची भंबेरी उडाली. पण त्याचा खुलासा कर्मचाऱ्यांनी केल्याची चर्चा आहे. मग या फाईलीमध्ये इंटरेस्ट कोणाचा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे आरसीएच समन्वयक म्हणून जबाबदारी आहे, त्या कर्मचाऱ्याने टेंडरची ही फाईल हाताळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. नवले यांनी ही जबाबदारी ‘त्या’ कर्मचाऱ्यावर कशासाठी दिली? यामागे कोणाचा ‘हात’ आहे? याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.
वरिष्ठांची जाणीवपूर्वक बदनामी कोणी केली?
सीईओ आव्हाळे यांनी या प्रकरणाची चौकशी लावल्यावर आरोग्य विभागाने मोठी खेळी केली असल्याची चर्चा आहे. चक्क वरिष्ठ पैसे घेतल्याची जाणीवपूर्वक चर्चा पसरवण्यात आली. यामुळे वरिष्ठांची बदनामी झाली. त्यामुळे ही चौकशी दाबली गेली, अशी चर्चा आता झेडपीत रंगली आहे. वरिष्ठांची बदनामी जाणीवपूर्वक कोणी केली? याचा आता शोध घेणे गरजेचे झाले आहे.