कुडाळमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव ; शेतकरी हैराण ,वनविभागाने घेतली बैठक
कुडाळ/ रोहन नाईक : तालुक्यात वन्यप्राण्यांचा धूडगुस पाहायला मिळत आहे. बागायती शेतींची नासधूस करणाऱ्या माकड आणि गवारेड्यांचं प्रमाण वाढत जात असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. याची दखल घेत वनविभागाने शेतकऱ्यांबरोबर बैठक घेतली आहे. या बैठकीत गवारेडे पकडण्यासाठीचे तंत्रज्ञान वनविभागाकडे नाही असं सांगण्यात आलं आहे. गावकऱ्यांना होणारा त्रास वनविभागाला दिसून येत असला तरी त्यामुळे गवारेडे हिसकावून लावण्याचा ठराविक कालावधी सांगता येत नाही, अशी माहिती उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी वेताळ बांबर्डे येथील बैठकीत दिली आहे. वन्यप्राण्यांमुळे शेती, बागायतीचे पर्यायाने होणारे शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यांना मिळणारी भरपाई यावर मार्गदर्शन करण्यासाठी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे उपस्थित राहिले होते.
यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक वनरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल अमित कटके, वनरक्षक ऋषिकेश कुंभार वनविभागाचे अन्य अधिकारी, अणाव सरपंच लीलाधर अणावकर, पणदूर सरपंच पल्लवी पणदूरकर, पणदूरचे माजी सरपंच दादा साईल, वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी, अमरसेन सावंत, हुमरमळा सरपंच समीर पालव, आवळेगाव सरपंच विवेक कुपेरकर उपस्थित होते. बैठकीत रेड्डी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना वनविभागामार्फत जेवढी काही मदत लागेल येईल ती निश्चितपणे करण्यात येईल. शेतकऱ्यांना होणारा माकडांपासूनचा उपद्रव माकड पकड मोहिम जलदगतीने राबवण्यात येईल असे सांगितले. यावेळी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी गवारेडे हुसकावून लावण्यासाठी शासकीय स्तरावरून काही प्रयत्न करता येईल काय यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील असे सांगून गटशेती करण्याचा सल्ला दिला.
यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, उपस्थित शेतकऱ्यांमधून सावळाराम अणावकर यांनी सांगितले की, वन्यप्राणी शेतपिकांचे वारंवार नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात तुटपुंजी भरपाई दिली जाते. त्यासाठी वेगवेगळे निकष लावले जातात. त्यासाठी संबंधित प्रशासनाने नुकसान भरपाईबाबत गांभीर्याने विचार करावा व जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकर्यांना कशी मिळेल याबाबत प्रयत्न करावेत, असे सांगितले.