अलिबाग : तांत्रिक अडचणीवर मात करून शासन, अधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वय करून मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू, गणपतीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन सुरक्षित वाहन चालविण्यासाठी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर, दुसरी लेन ही डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी व्यक्त केला. महामार्गाच्या कामासाठी अद्ययावत असे तंत्रज्ञान वापरले जात असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास हा सुखकारक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सुरू आहे. पनवेल ते झाराप असा एक दिवसाचा हा दौरा आहे. महामार्गावर पडलेल्या खड्यांची पाहणी करीत मंत्री, अधिकारी यांचा दौरा सुरू आहे. यावेळी वाकण येथे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बातचीत केली. आमदार प्रशांत ठाकूर, महामार्ग अधिकारी, ठेकेदार यांसह पत्रकार या दोऱ्यात सहभागी आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपादरी करण्याचे काम 2010 साली सुरू झाले. मात्र, बारा वर्ष झाले तरी आजही हा महामार्ग रखडलेला आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना आजही प्रवाशांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने हा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे महामार्ग पूर्ण करण्याकडे जातीने लक्ष देत आहेत. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी नवे ठेकेदार नेमले आहेत. मात्र कामाचे बिल बँकेमार्फत हे पूर्वीच्या ठेकेदार कडे जात असल्याने अडचणी येत आहेत. याबाबत ठेकेदार, अधिकारी, शासन यांच्यात बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला जात आहे. तांत्रिक अडचणी असल्या तरी समन्वयाने काम केले जात असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण होणार असल्याचे म्हटले असून दुसरी लेन डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. कशेडी भोगद्या बाबतही महामार्ग प्रमाणे तांत्रिक अडचणी आहेत. मात्र, तोही सुरू होईल असे म्हटले आहे. महामार्गाच्या कामासाठी अद्यावत अशा दोन मशिनी आणल्या आहेत. या मशीनद्वारे अर्धा किलोमिटर रस्ता दिवसभरात पूर्ण होत आहे. तर राज्यात किंवा इतर राज्यात अशा मशीन असतील तर त्या आणण्याच्या सूचना ठेकेदार याना दिल्या आहेत. यासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य राहणार असल्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.