Women Commission Rupali Chakankar Pune press on Dinanath Mangeshkar Hospital case
पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. जुळ्या मुलांना जन्म दिलेल्या तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने लाखो रुपयांची मागणी केल्यामुळे उपचाराला दिरंगाई झाली. यानंतर आता या प्रकरणाचा अहवाल देखील रुग्णालयाकडून सरकारकडे देण्यात आला आहे. यावर आता अजित पवार गटाच्या नेत्या व राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूचे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस आयुक्त आणि इतर अधिकारी, ससून रुग्णालयाचे अधिकारी यांची देखील आढावा बैठक घेण्यात आली. त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट देखील घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून रुग्णालयावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
पुण्यात रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णालयाने गोपनीय माहिती उघड केल्याचे म्हणत कानउघडणी केली आहे. चाकणकर म्हणाल्या की, “कोणतीही व्यक्ती ही डॉक्टरकडे उपचारासाठी गेल्यावर वैयक्तिक गोष्टी सांगत असते. डॉ. घैसास यांच्याकडे रुग्ण 15 तारखेला भेटले होते. त्या अगोदरचे उपचार आणि मेडिकल इतिहास सांगितला होता. घटना घडल्यावर दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाने स्वतःची समिती बनवली आणि रुग्णाच्या गोपनीय माहिती मांडली. याचा आम्ही निषेध करत असून याबाबत रुग्णालयाला समज दिली जाईल,” असे मत रुपाली चाकणकर यांनी मांडले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी मृत गर्भवती तनिषा भिसे या रुग्णालयामध्ये आल्याच्या घटनाक्रमक सांगितला. चाकणकर म्हणाल्या की, “रुग्ण हॉस्पिटलमध्ये सकाळी 09 वाजून 01 मिनिटाने गेले होते. डॉक्टर यांच्याशी संपर्क झाला आणि सर्जरीसाठी स्टाफकडे सूचना दिल्या. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी 10 लाख रुपयांची मागणी केली. 3 लाख रुपये आहेत असं कुटुंबियांनी हॉस्पिटलला सांगितले. अडीच वाजता रुग्ण बाहेर पडला. या पाच तासांत रुग्णावर कोणतेही प्राथमिक उपचार रुग्णालयाने केलेले नाहीत. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला ससूनमध्ये नेले. तिथून १५ मिनिटांमध्ये ते बाहेर आले आणि तिथून सुर्या हॉस्पिटलमध्ये नेलं. दुसऱ्यादिवशी डिलिव्हरी झाली, रक्तस्त्राव झाला आणि रुग्णाचा मृत्यू झाला. दीनानात मंगेशकर रुग्णालयाने 10 लाख रुपयांची मागणी केल्यामुळे रुग्णाची मानसिकता खचली,” असा घटनाक्रम रुपाली चाकणकर यांनी सांगितला.
पुढे चाकणकर म्हणाल्या की, “रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की डॉक्टरांना रुग्णांची पूर्ण मेमेडिकल कंडीशन माहिती होती. तरी त्यांनी फाईल घेतली. जर सुरुवातीलाच त्यांना आमची क्रिटीकल कंडिशन माहिती होती तर त्यांनी आमची फाईल घेतली कशाल? ऑपरेशनला आतमध्ये घेताना त्यांनी 10 लाखांची मागणी केली. रुग्णालयाने सुरुवातीलाच आम्ही ट्रीटमेंट करु शकणार नाही असं सांगायला हवं होतं. ऑपेशनची तयारी झाल्यानंतर पैशांची मागणी केल्यामुळे रुग्णाची मानसिकता खचली. आणि साडेपाच त्यांना उपचार दिले नाहीत,” असे मत रुपाली चाकणकर यांनी मांडले.
त्या म्हणाल्या की, “दीनानाथ मंगेशकर, सूर्या हॉस्पिटल आणि ससून रुग्णालयाचा अहवाल दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. माता मृत्यू अन्वेषण समितीकडून चौकशी होणार आणि त्यांचा सुद्धा अहवाल येणार आहे. धर्मदाय आयुक्तांचा अहवाल उद्या येणार आहे. रुग्णालयाने रुग्णावर उपचार करणे अपेक्षित होतं ते रुग्णाला मिळालं नाही, समितीच्या अहवालातून माहिती समोर आले आहे. धर्मदाय रुग्णालयाने त्यांच्या नावामध्ये धर्मदायाचा उल्लेख करणे गरजेचे आहे,” असे मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “राज्य समितीचा हा अहवाल आहे. इतर अहवाल आल्यानंतर रुग्णालयावर कारवाई होणार होणार आहे. इतर समितीनं दिलेल्या अहवालानंतर रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि नातेवाईकांनी केलेली तक्रार यावर अंतिम निष्कर्ष होईल. धर्मदाय आयुक्तालयांची नियमावली दीनानाथ रुग्णालयाने पाळली नाही. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी सुद्धा याप्रकरणाचा बाबत बोलणे झालं आहे. कोणाला वाचवायचं आहे कोणाला सोडायचं आहे असं काही नाही. नक्कीच दीनानाथ रुग्णालयावर गुन्हा दाखल होणार आहे. रुग्णालयाने रुग्णावर उपचार करणे अपेक्षित होतं ते उपचार मिळाले नाहीत. हा ठपका रुग्णालयावर ठेवण्यात आलेला असून रुग्णालय दोषी आहे,” असे स्पष्ट मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.